जळगाव : शरद पवार हेच आमचे चिन्ह आहे. त्यांच्यासोबतच राहणार असल्याचे मत माजी मंत्री देवकर यांनी व्यक्त केले. ‘राष्ट्रवादी’चे नेते अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. आमदारांच्या या कृतीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांचा पाठिंबा नसल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केले.
दरम्यान, अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी घेतलेल्या या निर्णयानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आकाशवाणी चौकातील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत माजी मंत्री गुलाबराव देवकर अध्यक्षस्थाना वरून बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, महानगराध्यक्षा मंगला पाटील, वाल्मिक पाटील, कल्पना पाटील, प्रतिभा शिरसाठ, विशाल देवकर आदी उपस्थित होते.
आमदार खडसेंसह 8 माजी आमदार शरद पवारांसोबत – रवींद्र पाटील
आमदार एकनाथ खडसे यांच्यासह अरुणभाई गुजराथी, डॉ.सतीश पाटील, दिलिप वाघ, राजीव देशमुख, अरुण पाटील, संतोष चौधरी, गुलाबराव देवकर हे आठ माजी आमदार शरद पवार यांच्यासोबत आहेत. चोपड्याचे माजी आमदार जगदिशचंद्र वळवी यांच्याशी संपर्क झालेला नाही. शरद पवार यांनी मुंबईत बोलावलेल्या बैठकीला जिल्ह्यातील नेते, पदाधिकारी जाणार असून प्रतिज्ञापत्र भरुन देणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील यांनी सांगितले.
माजी आ. गुलाबराव देवकर वगळता सर्वांची पत्रकार परिषदेला अनुपस्थिती
मात्र, शरद पवारांसोबत असल्याचे सांगत असलेल्या माजी आमदारांपैकी गुलाबराव देवकर वगळता कुणीच पत्रकार परिषदेला उपस्थित नव्हते. आमदार एकनाथ खडसे हे मुंबईला गेलेले आहेत. डॉ.सतीश पाटील यांनी शरद पवारांसोबत असून प्रकृती बरी नसल्याने बैठकीला येणार नाही. प्रतिज्ञापत्र भरुन देणार असल्याचे अॅड.पाटील यांनी सांगितले. मंत्री अनिल पाटील राष्ट्रवादीच्या कार्यालयात आल्यास त्यांचे स्वागत करणार का? असा प्रश्न पत्रकारांनी जिल्हाध्यक्षांना विचारला. त्यांचे स्वागत करू,असे उत्तर त्यांनी दिले.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संपर्क करुन जिल्ह्यातील राष्ट्रवादीची भूमिका जाहीर करण्याची सूचना केली. शरद पवार व सुप्रिया सुळे यांच्या कार्यालयातूनही फोन आला असल्याचे जिल्हाध्यक्ष अॅड.पाटील यांनी सांगितले. मुंबई येथील बैठकीला जिल्ह्यातील नेते, पदाधिकारी जाणार आहेत. अजीत पवार यांनीही बुधवारी सायंकाळी 5 वाजता बैठक बोलावलेली आहे. या बैठकीलाही उपस्थित राहण्याबाबत फोन आला होता. मात्र, आम्ही शरद पवार यांच्या बैठकीला जाणार आहोत. असेही अॅड.पाटील यांनी सांगितले.