मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने नागालँडमध्ये दिलेल्या पाठिब्यांचे पडसाद आज विधानसभेत उमटले. मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीला ‘नागालँडमध्ये ५० खोके, बिलकुल ओके’ या शब्दात डिचवल्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये तु-तु-मै-मै झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्यातही शाब्दिक चकमक उडाली.
मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, नागालँडमध्ये राज्यातला जो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस त्यांनी भाजपच्या फक्त मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिलेला आहे. फक्त मुख्यमंत्र्यांना. बदलाचे वारे पाहा कसे वाहायला लागले. एकीकडे जातीयवादी सरकार म्हणून आरोप करायचे आणि तिकडे जाऊन मांडीला मांडी लावून बसायचे. आणि बदलाचे वारे कसे वाहायला लागले आहे. आमचे म्हणणे आहे की, पन्नास खोके नागालँड ओके, असे झालेय का. हा माझा सवाल आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, तुम्ही दररोज येऊन खोके-खोके करता. आपण जेव्हा दुसर्याकडे बोट दाखवतो, तेव्हा तीन बोटे आपल्याकडे असतात. सोयीचे तेवढे घ्यायचे. आपले ठेवायचे झाकून, दुसर्याचे बघायचे वाकून, हे कसे चालते. पवार जे-जे बोलले आहेत, त्याच्या नेमके उलटे झालेले आहे. एक कसब्याची पोटनिवडणूक जिंकली. मात्र, तीन राज्य भाजपने जिंकले, ते विसरले. सर्वसामान्य लोकांनी मुख्यमंत्र्यांना जागा दाखवली. पिंपरी चिंचवडमध्ये तुम्हाला दाखवली नाही. जसे नागालँडमध्ये झाले. मागितला नसताना पाठिंबा दिला. २०१४ ला ही तुम्ही तसे केले. काचेच्या घरात राहणार्यांनी दुसर्यांच्या घरावर दगड फेकत नसतात. आम्ही बोलत नाही.
अजित पवार म्हणाले की, प्रत्येक गोष्टीत राजकारणच आणले पाहिजे असे नाही. अध्यक्ष महोदय आज केंद्र सरकार त्यांच्या ताब्यात आहे. राज्य सरकार त्यांच्या ताब्यात आहे. सगळ्या संस्था त्यांच्या ताब्यात आहेत. चौकशी करा ना, ही कुठली पद्धत काढली. केंद्र आणि राज्य सरकार तुमच्या हातात आहे. कारण नसताना बदनामी करू नका. इशान्येच्या राज्यांची राजकीय परिस्थिती वेगळी आहे. तिथे सगळे मिळून सर्वपक्षीय सरकार स्थापन करतात, अशी तिथली परंपरा आहे. भारतातला तो भाग, भारतातच राहण्यासाठी भारतीय म्हणून निर्णय घेतलेला आहे. त्याची चर्चा इथे करून गैरसमज निर्माण करायचा काहीच कारण नाही.