जळगाव : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून सत्तेत सहभागी झाले आहेत. अजित पवारांना शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपद मिळालं असून, त्यांच्यासोबत छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, अनिल पाटील, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि धर्मरावबाबा आत्राम या 8 जणांना मंत्रिपदाची शपथ घेतली. विशेषतः यामुळे शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
राष्ट्रवादीचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्यात आगमन झाले. रेल्वे स्थानकावर त्यांचे जल्लोषात स्वागत झाल्यानंतर ते आपल्या अंमळनेर तालुका या मतदारसंघाकडे मार्गस्थ झाले. यादरम्यान मार्गात त्यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी येथील निवासस्थानी जाऊन गुलाबराव पाटील यांची भेट घेत आशीर्वाद घेतले. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या समवेत संजय पवार यांची उपस्थिती होती. याठिकाणी अनिल भाईदास पाटील यांचे औक्षण करण्यात आले, तसेच त्यांना पेढा भरवून तोंड गोड करण्यात आले. यावेळी गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.
जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी ते काम करतील, अशा शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत. त्यांनी भगवे विचार स्वीकारले आहेत, त्यांनी शिवसेना भाजप सोबत येण्याचा विचार केला. त्यामुळे त्यांचं भगवी शाल पांघरुन स्वागत केलं. भगवी शाल केवळ शिवसेनेची नाही, भगवा हा त्याचंच प्रतीक आहे, असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
थोडी फार नाराजी
शिंदे आणि फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतल्यामुळे शिंदे गटाच्या आमदारांमध्ये नाराज असल्याच्या विषयावर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, “थोडी फार नाराजी तर राहणारच आहे. काही जणांना मंत्रीपद मिळणार होते, मात्र अचानक आता तिसरा वाटेकरी आल्यामुळे नाराजी आहे, मात्र एकनाथ शिंदेंनी ती दूर केल्याचंही त्यांनी सांगितलं.
तसेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा सुरु आहेत. यावर पाटील म्हणाले की, “ते दोघे एकत्र येतील किंवा नाही, येणार हे पंचांग बघून सांगावे लागेल. या चर्चा आहेत, मागच्या काळात आम्ही असताना सुद्धा दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावं, अशी हाक दिली होती. मात्र एकत्र येण्याचा हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे, मात्र दोघे जर एकत्र येत असतील तर आमच्या त्यांना शुभेच्छा असल्याचे म्हणाले. तसेच ठाकरे गटात पुन्हा जाण्यासंदर्भात सांगेल तुम्हाला मी तसं… पण तसं तर काही नाहीये… तसं काही सांगू शकत नाही, असं म्हणत गुलाबराव पाटलांनी सूतोवाच केल्याचं बोललं जात. त्याचबरोबर पुढचा मंत्रीमंडळ विस्तार हा 10 जुलै रोजी होणार असल्याचं यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
तर मंत्री गुलाबराव पाटील यांची सदिच्छा भेट घेतल्यानंतर मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. गुलाबराव पाटील असतील गिरीश महाजन असतील, यांचे सुरुवातीपासूनच आम्हाला सहकार्य लाभले आहे. जिल्ह्यात आल्यानंतर गुलाबराव पाटील हे ज्येष्ठ नेते असल्यामुळे त्यांच्याकडे जाणं क्रमप्राप्त आहे. त्यामुळे त्यांची सदिच्छा भेट घेतली. भगवी शाल मला काही नवीन नाही, 25 वर्ष मी भगवी शाल घालूनच फिरत होतो. विरोधात असताना मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली असेल. मात्र विरोधात असताना मी माझी भूमिका पार पाडली, असेसुद्धा यावेळी मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी स्पष्ट केले.