जळगाव : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील निकाल लागल्यानंतर पुन्हा दोन्ही गटांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. दरम्यान, मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर जोरदार टीका करत, उद्धव ठाकरेंनी संजय राऊतसारखे भूत आवरावे, असा सल्ला दिलाय.
काय म्हणालेय गुलाबराव पाटील ?
आम्हाला गद्दार म्हटलं गेलं असलं तरी आम्ही कोणतीही गद्दारी केली नाही. पक्षाचे विचार आम्ही सोडले नाहीत, पक्ष वाचवण्यासाठी आम्ही वेगळे झालो, बहुमताच्या आधारावर आमच्या बाजूने हा निकाल लागला अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.
खडसेंनी राष्ट्रवादी फुटणार नाही याची काळजी घ्यावी
एकनाथ खडसे यांनी घटनेतील त्रुटी शोधून हा निकाल दिला असल्याची प्रतिक्रिया दिली होती त्याला उत्तर देताना पाटील यांनी म्हटले आहे की, एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी पक्षाबाबत बोलण्याचा त्यांना कोणताच अधिकार नाही. राष्ट्रवादी पक्षाने त्यांना भरपूर दिले आहे, राष्ट्रवादी फुटणार नाही याची काळजी घ्यावी आणि राष्ट्रवादीबाबत चांगला विचार करावा.
शिवसेनेनं जो पवित्रा घेतला आहे तोच पवित्रा अजित पवार यांनी घेतला आहे. हा निकाल अन्यायकारक नाही, ज्या चाळीस लोकांनी पक्ष वाढविण्यासाठी तुम्हाला सावध केले होते. तुम्ही त्याला महत्व दिले नाही उलट त्यांनी या बाबत विचार करायला हवा होता मात्र त्यांनी तो केला नाही. त्यामुळे ते जनतेत जरी फिरले तरी आम्ही गद्दारी केली असे जनता त्यांना म्हणणार नाही. त्यांनी गद्दारी केली नाही तर पक्ष वाचवला आहे.
उद्धव ठाकरेंनी संजय राऊतसारखे भूत आवरावे : गुलाबराव पाटील
उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतसारखे भूत आवरावे हाच आपला उध्दव ठाकरे यांना सल्ला असल्याची प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. घटना सुद्धा ज्यांना माहीत नाही ते काय पक्ष चालवणार ,ज्यांनी आमच्यावर आरोप केले त्यांना ही मोठी चपराक असल्याचं ही मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. आमदार अपत्राता प्रकरणी निकाल लागल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांचं जळगाव येथे आगमन झाले यावेळी रेल्वे स्थानकावर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.