अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करून सत्तेत सामील झाले आहे. मात्र अद्याप खातेवाटप आणि मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त लागला नाहीय. त्यामुळे सरकारमध्ये अस्वस्थता असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यातच खातेवाटपाबाबत मंत्री गुलाबराव पाटील यांनी थोडी गडबड असल्याची कबुली दिली आहे.
काय म्हणाले ना. पाटील?
आज उद्यामध्ये मंत्रीमंडळाचा विस्तार होईल, मी त्यासाठीच थांबलो होतो, मात्र नाशिक येथील वणी गडावरील अपघाताची घटना घडली. त्यामुळे मला नाशिक यावं लागलं. मात्र आज दुपारपर्यंत किंवा सकाळपर्यंत मंत्री मंडळाचा विस्तार होईल असं मी ऐकतो आहे, असं पाटील यांनी म्हटलं.
पाटील पुढे म्हणाले की, कुणाला काय खात मिळेल हा निर्णय वरिष्ठ ठरवतील. परंतु, तिसरा भिडू आल्यामुळे खातेवाटपात थोडी गडबड होणार आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की, खातेवाटपावरुन एकमेकांमध्ये नाराजी राहिल, असही त्यांनी नमूद केलं. तसेच अर्थ खात्याच्या बाबतीत वरिष्ठ जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य राहिलं. मात्र तीन पार्टनर झाल्यामुळे थोडा विलंब होतोय, हे निश्चित, असंही त्यांनी नमूद केलं