Gulabrao Patil : थेट बोलले अन् मुख्यमंत्री शिंदेंचा फोन ? तातडीने मुंबईला रवाना

जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आल्याने मंत्री गुलाबराव पाटील हे चारचाकी वाहनानेच बाय रोड मुंबईकडे रवाना झाले आहेत. दरम्यान, अर्थ खात्यासारखे नालायक खाते नाही. अनेक वेळा नकारात्मक शेरा मिळून फाईल परत येत असे. परंतु, पाठपुराव्यामुळे आमचे काम झाले. दोन अडीच महिन्यात येणारे विघ्न दूर करण्यासाठी प्रयत्न करा. स्वार्थाबरोबर परमार्थही साधावा लागतो, असे वक्तव्य मंत्री पाटील यांनी केले होते. आता या वक्तव्यामुळे त्यांना मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईला बोलावून घेतले असल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

जळगाव येथे शनिवारी हातपंप आणि वीजपंप दुरुस्ती आणि देखभाल कर्मचारी संघटनेच्या वतीने आयोजित सन्मान सोहळ्यात पाटील यांनी मंत्री म्हणून केलेल्या कामांचा थोडक्यात आढावा घेतला. सरकारमधे राज्यमंत्र्याला फारशी कामे करुन घेता येत नाहीत. उद्धव ठाकरे सरकारमध्ये असताना पाणी पुरवठा खाते मागितले नव्हते. मंत्र्याने आपल्या खात्यातील कर्मचाऱ्यांना खुश ठेवले तरच चांगले काम होऊ शकते. आमदार जर मंत्री होऊ शकतो तर, उपअभियंत्यास वरची जागा का मिळू नये, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

मी माझ्या खात्यातील अनेकांना पदोन्नती दिली. माझ्यासारखा पदोन्नती देणारा दुसरा कोणी नसेल. मी देवदूत नाही. गरिबी जवळून पाहिली आहे. कष्टकऱ्यांचे पैसे जे खातात, त्यांचे हात लुळे झाल्याशिवाय राहणार नाहीत. जनतेला पाणी पाजण्याचे पुण्याचे काम मला मिळाले. आयुष्यात आता लोकांसाठीच काम करायचे आहे. राजकारणात जिथे गरज असेल, तिथेच मंत्री म्हणून बडेजावपणा केला. किती लोकांची कामे केली हे महत्त्वाचे. निवडणुकीत हेच आशीर्वाद कामास येणार आहेत, असा विश्वासही गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.

दरम्यान, याच वक्तव्यावरून गुलाबराव पाटील यांच्यावर महायुतीतील मित्र पक्षातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे तर दुसरीकडे विरोधकांकडून टीका केली जात असून महायुतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर मंत्री गुलाबराव पाटील हे त्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत खुलासा करतात का ? आणि काय खुलासा करतात ? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.