जळगाव : महाराष्ट्रात अल् निनोमुळे पावसाचे प्रमाण कमी झाल्याने अद्यापही धरणांची स्थिती चिंताजनक आहे. दरम्यान पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे सोडल्यास यंदा अनेक जिल्ह्यात पावसामुळे खरिप धोक्यात आला आहे. तर काही जिल्ह्यात ऐन पावसाळ्यातच टँकरने पाणी देण्याची वेळ आली आहे. यामुळे मागच्या दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतीसह जनतेला पाणी मिळेल याची उपाययोजना तयार करण्याचे आदेश दिले. तर आज (ता.२८) मंत्री गुलाबराव पाटील यांनी कृत्रीम पाऊस पाडण्याचे संकेत दिले आहेत.
जळगाव जिल्ह्यात या दोन महिन्यात पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. रोज आकाशात ढग गर्दी करतात, पावसाचे वातावरण तयार होते, मुसळधार पाऊस होईल असे वाटते. मात्र पाऊसच पडत नाही. ऐन हंगामात तब्बल २१ दिवसांपेक्षा अधिक दिवस पाऊस झाला नाही. त्यामुळे त्यामुळे पिके करपून जाण्याची भिती आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कृत्रिम पाऊस पाडण्याचे संकेत दिले.
जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात सरासरी पावसाच्या तुलनेत २२ टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळाची चाहुल लागत असून, सरकारने पिके वाचविण्यासाठी कृत्रीम पाऊस तरी पाडावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. कृत्रीम पाऊस पाडण्यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत असून पोषक वातावरण असल्यावर याबाबत शास्रज्ञांशी चर्चा सुरु असून त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.
कृत्रिम पाऊस पाडताना पोषक वातावरण असावे लागते. टेक्निकल अडचण येऊ नये, म्हणून पोषक वातावरण असल्यावर कृत्रिम पाऊस पाडण्याबाबतचा शासनाच्या चर्चेतील निर्णय घेतला जाईल, अशी ही माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
राज्यात अनेक ठिकाणी पाऊस नसल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून ‘पाऊस पडावा, यासाठी आपण देवाला प्रार्थना करु. तसेच गेल्या दीड ते दोन महिन्यापूर्वी मी स्वतः कॅबिनेटच्या बैठकीमध्ये कृत्रिम पाऊस पाडण्याबाबत प्रश्न मांडला असल्याची त्यांनी माहिती दिली. कृत्रिम पाऊस पडताना पोषक वातावरण असावे लागते. टेक्निकल अडचण येऊ नये, म्हणून पोषक वातावरण नसल्यावर कृत्रिम पाऊस पडण्याबाबतचा शासनाच्या चर्चेतील निर्णय घेतला जाईल, अशीही माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.