जळगाव : सत्तेत तिसरा वाटेदार आल्यामुळे शिंदे गटात अंतर्गत कलह सुरू झाल्याचं दिसून येत आहे. सातत्याने शिंदे गटाचे आमदार राष्ट्रवादीला मिळणाऱ्या खात्यांना विरोध करत आहेत. मात्र पाणीपुरवठा मंत्री व शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी शिंदे गटाला मिळणाऱ्या वाट्याबद्दल मोठं विधान केलं आहे.
महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यांना प्रशासनाचा फारसा अनुभव नव्हता. तसेच अर्थ खाते आणि उपमुख्यमंत्रीपद अजित पवारांकडे असल्याने निधी मिळण्याबाबत आमदारांना अडचणी येत होत्या. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याने शिंदे गटाला वाटा सारखाच मिळेल. त्यात कुठल्याही प्रकारची गडबड होणार नाही. याची आम्हाला खात्री आहे.
एकनाथ खडसेंच्या टीकेला उत्तर देताना पाटील म्हणाले, तीन वाटेकरी झाल्याने आणि मात्तबर नेते असल्याने सन्मानाचं खातं देणं आवश्यक होत. मात्र मागच्या सरकारप्रमाणे होणार नाही. आता फाईल मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून जाणार आहे. त्यामुळे संतुलित काम होईल, गडबड होणार नाही, असं पाटील यांनी नमूद केलं.
अर्थ खाते अजित पवारांकडे असलं तरी आपण मुख्यमंत्री असल्याने आमदारांना काहीच अडचणी येणार नाहीत असं वक्तव्य कोल्हापूरच्या सभेत एकनाथ शिंदे यांनी केलं होतं. त्यावर गुलाबराव पाटील यांनी कोल्हापूर येथे ही प्रतिक्रिया दिली आहे.