जळगाव : भाजप नेते गिरीश महाजन व एकनाथ खडसे यांच्यामधील वाद सर्वांना माहिती आहे. पण आता हा वाद मिटणार असून, मंत्री गिरीश महाजन आणि आमदार एकनाथ खडसे हे एकत्र येणार असल्याचा चर्चा सुरु झाल्या आहे. कारण मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन व एकनाथ खडसे दोघे एकत्र येण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच या दोघांना एकत्र आणण्याची जबाबदारी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे पार पाडतील, असा विश्वास मंत्री पाटील यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता मंत्री महाजन आणि आमदार एकनाथ खडसे यांना एकत्र आणण्यात मंत्री रक्षा खडसे यशस्वी होतात का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
काय म्हणाले मंत्री पाटील ?
एकनाथ खडसे व गिरीश महाजन या दोघांनी एकत्र यावे. आता केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी एकनाथ खडसे व गिरीश महाजन त्यांना एकत्र आणणार आहे. ही चांगली गोष्ट आहे. रक्षा खडसे जर या दोघांना एकत्र आणत असतील तर त्यांना आमची सुद्धा सदिच्छा आहे. तेच नाही जळगाव जिल्ह्यातील राजकीय पक्षातील इतर लोकांनी जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र राहावे, असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.
महाजन अन् खडसे वाद जुना
जळगाव जिल्ह्यातील एकनाथ खडसे अन् गिरीश महाजन यांचा वाद जुना आहे. भोसरी भूखंड प्रकरणात एकनाथ खडसे यांना राजीनामा द्यावा लागल्यानंतर हा वाद वाढला होता. दोन्ही नेते वैयक्तीक आरोप-प्रत्यारोप करत होते. त्यानंतर एकनाथ खडसे भाजपातून बाहेर पडले अन् राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले. त्याचवेळी एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे भाजपात होती.