नंदुरबार : जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे आणि भाजपनेते गिरीश महाजन यांच्यातील वाद वैयक्तिक पातळीवर गेले आहेत. त्यामुळे दोघा नेत्यांनी संयम ठेवावे. दोघांमधील वाद मिटवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून दोनी नेत्यांनी बोलताना संयम ठेवावा कुणी आरे केले तर दुसरा कारे करेल, त्यामुळे सामाजिक जीवनात वागताना तारतम्य ठेवणे महत्त्वाचे आहे, असा मोलाचा सल्ला राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील नंदुरबार जिल्ह्याच्या दौर्यावर असून त्यांनी जिल्ह्याच्या कामाचा व शिंदे गटाच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना अनेक विषयांवर जोरदार फटकेबाजी केली.आदित्य ठाकरे देशातील युवा नेत्यांना भेटण्यासाठी विविध राज्यांचा दौरा करणार आहे. काल बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची आदित्य ठाकरे यांनी भेट घेतली. या संदर्भात बोलताना आदित्य ठाकरे महाराष्ट्रात फिरले असते, तर त्यांना बिहारमध्ये जाण्याची गरज भासली नसती, अशी बोचरी टीका गुलाबराव पाटील यांनी केली आहे.
सांगली जिल्ह्यात असलेल्या जत तालुक्यातील गावांवर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दावा केल्यानंतर गुलाबराव पाटील यांनी महाराष्ट्रातील सीमा भागातील ग्रामपंचायतीचा साधा वार्ड सुद्धा कर्नाटकमध्ये जाऊ देणार नाही. राज्य सरकारसाठी हा प्रश्न संवेदनशील असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी भविष्य पाहिल्याच्या आरोपावर बोलतांना ते म्हणाले की, मुख्यमंत्री स्वतः कर्तृत्वान असून त्यांना स्वतःचे भविष्य पाहण्याची गरज नसून ते भविष्यकाराचे भविष्य पाहतील. राजकारणात नेत्यांना कार्यकर्त्यांच्या भावनांच्या आदर करावा लागतो. कार्यकर्त्यांनी सांगितलं म्हणून मुख्यमंत्री तिकडे गेले असतील, असा दावाही त्यांनी यावेळी केला.