गुलाबराव पाटील म्हणाले, संजय राऊतने शिवसेनेची वाट लावली

जळगाव : दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिवसेना बांधली ती कुठेतरी लयास जातेय असा विषय आल्यावर आम्हाला वाईट वाटले. आमदारांना थांबवण्याचा प्रयत्न करा म्हणून आम्ही उद्धव ठाकरे यांना सांगायला गेलो तर उलट मलाच सांगितले, तुम शेर जैसे दिखते हो, लेकीन दिल चुहे जैसा है, तुला जायचे असेल तर तू जाऊ शकतो. हे संजय राऊतांचे वाक्य आहे. त्याने शिवसेनेची वाट लावली. त्याच्यामुळेच शिवसेनेला हे दिवस आले आहेत, असा संताप राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेवून केलेल्या बंडाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, त्यांच्याकडे (ठाकरे गट) बोलायला दोनच मुद्दे आहेत, एक गद्दार आणि दुसरा खोके. ठीक आहे, परंतु ३५ वर्ष आम्ही तिथेच घासली आहेत. त्यांनी आमची बॅक हिस्ट्री चेक करावी. आम्ही घरांवर तुळशीपत्र ठेवून कामे केली आहेत, असे गुलाबराव पाटील म्हणाले.

सुरुवातीला जेव्हा काही आमदार गेले, तेव्हा आम्ही सांगून सुद्धा कोणीतरी एखादा तीनपाट माणूस त्यांना सल्ला देत असेल आणि ते त्याचे ऐकत असतील तर काय होणार. मी तर ३३ नंबरला गेलो ना? मी त्यांना सांगून गेलो. गद्दारी करायचीच असती तर नारायण राणेंनी केली तेव्हाच गेलो असतो. त्यावेळी मी आमदार होतो आणि त्यावेळीही आम्हाला ऑफर होती. राज ठाकरे गेले तेव्हाही गद्दारी करू शकलो असतो, परंतु आम्ही तसे केले नाही. यावेळी मात्र विचारांचा विषय आला, असे गुलाबराव पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले.