पाचोर्‍याच्या सभेआधीच गुलाबराव पाटील – संजय राऊतांमध्ये जुंपली

जळगाव : माजी आमदार स्वर्गीय आर.ओ.पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरणाच्या निमित्ताने येत्या २३ एप्रिलला उद्धव ठाकरे पाचोरा येथे येत आहेत. यावेळी पाचोरा येथे त्यांची जाहीर सभा देखील होणार आहे. शिवसेना फुटल्यानंतर उध्दव ठाकरे प्रथमच जळगाव जिल्ह्यात येणार असल्याने या सभेची ठाकरे गटाकडून जय्यत तयारी सुरु आहे. शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी या दौर्‍याचे स्वागत केले आहे मात्र त्याचवेळी खासदार संजय राऊत यांना इशाराही दिला आहे. त्यावर राऊत यांनी पटलवार केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

माजी आमदार स्वर्गीय आर.ओ.पाटील यांच्या कन्या आणि ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी या सभेचं आयोजन केलं आहे. या सभेबाबत गुलाबराव पाटील म्हणाले की, आर.ओ.पाटील यांचे माझ्यावर फार उपकार होते. त्यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी उद्धव ठाकरे येत आहेत. आर.ओ.पाटील यांचे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर पहिल्यापासून संबंध होते. त्या प्रेमापोटी उद्धव ठाकरे येत आहेत. पुतळ्याचं अनावर करण्यासाठी येत असतील, तर जिल्ह्यात उद्धव ठाकरेंचं स्वागत आहे. पण, सभेत संजय राऊतांसारख माणूस माझ्यावर बोलत असेल, तर मी एसपींना पत्र देणार आहे, त्यांनी चौकटीत राहून बोलावं. अन्यथा सभेत घुसणार आहे, असा इशारा गुलाबराव पाटलांनी दिला आहे.

गुलाबराव पाटलांच्या या वक्तव्यावर संजय राऊतांना आत पत्रकार परिषद प्रश्न विचारण्यात आला. घुसा घुसा. तुम्ही आम्ही वाट बघत आहोत. घुसा आणि परत जाऊन दाखवा असं प्रतिआव्हान राऊतांनी गुलाबराव पाटलांना दिलं आहे. आज मुंबईत पत्रकारांशी ते बोलत होते. राऊत व पाटील यांच्या वाक्युध्दामुळे सभे आधीच राजकीय धुराळा उडाला आहे. यामुळे सभेची उत्सुकता वाढली असून सभेत उध्दव ठाकरे काय बोलतात? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.