जळगाव : उद्धव ठाकरेंनी काल कोकणातील खेडच्या सभेत शिंदे गटावर जोरदार टीका केली होती. त्यांच्या टीकेला गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. यावेळी गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाला होळीच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, होळीच्या दिवशी आपण रागाच्या दुःखाच्या सगळ्या गोष्टी होळीत टाकत असतो. आज आपल्याला मागच्या सगळ्या गोष्टी विसरायच्या आहेत.
मी माझ्या मित्रांना आणि विरोधकांना होळीच्या शुभेच्छा देतो. विचारांची ही लढाई आहे. या लढाईत फरफटत गेलेला विचार हा यशस्वी शिखरापर्यंत नेत नाही. मूळ बेस आपला हिंदुत्व आहे, तो बेस सोडल्यामुळे हा प्रोब्लेम उभा राहिला आहे. तरी पण होळीच्या दिवशी मला वाईट बोलण्याची मानसिकता नाही, असं म्हणत गुलाबराव यांनी ठाकरे गटाला आणि ठाकरे गटाच्या नेत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या.
पाळधी येथील निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधतांना गुलाबराव पाटील म्हणाले की, बाळासाहेबांच्या नाव वापरू नका हे उद्धव ठाकरे शिंदे गटाला उद्देशून पाचव्या सहाव्या वेळेस बोलले आहेत. त्यामुळे त्या गोष्टीला किती धार द्यावी, हे मला तरी वाटतं चुकीचं होईल. महापुरुषांचे फोटो, नाव वापरणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. बाळासाहेब हे त्यांची स्वतःची प्रॉपर्टी नाही.
मान्य आहे ते त्यांचे वडील आहेत. पण ते या देशाची आणि हिंदू समाजाची प्रॉपर्टी आहे. त्यामुळे त्यांचं नाव कुणीही वापरेल, असं ते म्हणाले. उद्धव ठाकरेंसोबत मी ३५ वर्षे राहिलो आहे. त्यांचे शब्द प्रयोग मला माहिती आहेत. त्यामुळे आम्ही रक्त पिणारे नाही तर रक्त देणारे ढेकूण आहोत, असा चिमटा देखील त्यांनी उद्धव ठाकरे यांना काढला.