गुंतवणूक पंचायतन…. 15व्या आवृत्तीच्या निमित्ताने

पुस्तक परीक्षण
डॉ. केदार मारुलकर
कोल्हापूर

गुंतवणूक…. खरंतर सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय पण तितकाच काही कारणाने सतत पुढे ढकलला जाणारा आणि पुरेशा माहितीअभावी बर्‍याच वेळेला चुकीच्या दिशेने घेतला जाणारा निर्णय. आज हा विषय निवडण्यामागे केवळ आपले ज्येष्ठ समूहसदस्य चंद्रशेखर टिळक हे या पुस्तकाचे लेखक आहेत हे कारण नाही, तर गुंतवणूक करताना विशेषतः शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करताना कोणते निकष वापरले पाहिजेत आणि कोणती काळजी घेतली पाहिजे हे या परिचयाच्या माध्यमातून सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न आहे. तसेच मराठीमध्ये गुंतवणूक आणि शेअर बाजार यावर फारसे लिखाण पुस्तक स्वरूपात झालेले नाही. विविध वर्तमानपत्रातून काही प्रमाणात साप्ताहिक लेख वगैरे येत असतात. परंतु गुंतवणूक हा विचार अत्यंत गांभीर्याने आणि अभ्यासाने करण्याची गरज आहे. ही गरज ओळखून जगातील पाच सर्वात यशस्वी गुंतवणूकदारांचे गुंतवणूकविषयक विचार या पुस्तकातून मांडले आहेत. लेखकाच्या शब्दात सांगायचे तर हे एकप्रकारे पंचायतन आहे. गुंतवणुकीसारखा क्लिष्ट पण महत्त्वपूर्ण विषय विविध प्रसंग, समर्पक काव्यपंक्ती आणि खुसखुशीत लेखनशैली यामुळे अवजड न बनता सहज समजेल अशा भाषेत मांडलेला आहे.

या पाच महान गुंतवणूकदारांपैकी पहिले बेंजमिन ग्रॅहम. यांच्याविषयी लिहिताना सुरुवातच गुंतवणूक हा काळजी घेण्याचा विषय आहे, काळजी करण्याचा नाही, या वाक्याने केली आहे. बेंजामिन यांनी गुंतवणुकीसंदर्भात पाळलेले काही नियम याप्रमाणे- गुंतवणूकदार व्हा सट्टेबाज नव्हे, गुंतवणुकीचे नियम योग्य पद्धतीने ठरवा आणि ते काटेकोरपणे पाळा, कमीत कमी भावात नेहमीच शेअरची खरेदी करता येत नाही, एकूण गुंतवणुकीच्या 25 टक्के रक्कम रोख्यांमध्ये गुंतवावी, एकाच कंपनीच्या शेअर्समध्ये पूर्ण रक्कम गुंतवू नये, स्वस्त आहे म्हणून कोणत्याही कंपनीचे शेअर घेऊ नये, गुंतवणूकदाराने आर्थिक व मानसिक दृष्ट्‌या अल्पकालीन वाईट निकालांची तयारी ठेवली पाहिजे आणि अनेक जण करत आहेत म्हणून आपणही तीच गोष्ट केली पाहिजे असे न करता स्वतंत्रपणे विचार करणे आवश्यक आहे. ग्रॅहम यांनी नेहमीच मूल्याधिष्ठित गुंतवणुकीला प्राधान्य दिले. त्यामुळे नेहमीच्या चढ-उतारांवर फार लक्ष देण्याची गरज नसते, असे त्यांचे स्पष्ट मत आहे. त्यांनी सट्टेबाजीला कडवा विरोध केला. स्वतः हेजिंगमध्ये वाकबगार असूनही सामान्य गुंतवणूकदारांनी बातम्या, किस्से यावर भरोसा ठेवून सट्टेबाजीत पडू नये, असे त्यांनी बजावले आहे.

जागतिक कीर्तीचे दुसरे गुंतवणूक तज्ज्ञ सर जॉन टेम्पलटन यांनी तेजीपेक्षा मंदीच्या काळात अधिक गुंतवणुकीच्या संधी असतात, असे सूत्र मांडले आहे. मात्र असा विचार करतानाच काही गोष्टी कटाक्षाने पाळल्या पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले आहे. प्राईस टू सेल्स; प्राईस टू अर्निंग; प्राईस टू बुक व्हॅल्यू ही गुणोत्तरे जास्त असतील तर अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू नये. सामान्य गुंतवणूकदार बाजार अचानक कोसळल्यामुळे शेअर्स खालच्या भावाला विकून मोकळे होतात तेव्हा चाणाक्ष गुंतवणूकदाराने अचूक फायदा उठवून असे स्वस्त शेअर्स खरेदी करावेत, असे आवाहन ते करतात. इतरांनी दुर्लक्षित केले, शेअर्स खरेदी करायचे आणि असे शेअर्स किमान चार वर्षे तरी बाळगायचे आणि हे निवडताना आपला अनुभव आणि आजूबाजूला घडणार्‍या घडामोडी यांचा योग्य ताळमेळ घालावा, अशी अपेक्षा ते व्यक्त करतात.

गुंतवणूक पंचायतनामधील तिसरे महत्त्वाचे आणि गुंतवणूकदार म्हणूनच नव्हे तर सेलिब्रिटी म्हणूनसुद्धा जगन्मान्यता पावलेले वॉरेन बफे. नशिबाला अभ्यास, धाडस, समयसूचकता, उत्साही कार्यप्रवणता अशा गुणांची जोड देत ते गुंतवणूक क्षेत्रात अत्युच्च स्थानावर पोहोचले. बर्‍याच बाबतीत बेंजामिन ग्रॅहम यांचा प्रभाव त्यांच्यावर दिसतो. बफे यांनी कधीही बाजाराचे भाकीत केले नाही. संभाव्य परिस्थिती त्याचा शेअर बाजारावर होणारा परिणाम यावरच्या चर्चांमध्ये ते फारसे उत्सुक नसत. तसेच सट्टाबाजारात करतात तसा बीटा लिव्हरेज, डे ट्रेडिंग अशा पद्धतीचा विचार त्यांनी कधीही केला नाही. सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी डे ट्रेडिंगपासून दूर राहावे असे त्यांनी ठासून सांगितले आहे. गुंतवणूक क्षेत्रातील यश हे अभ्यास, आकलनशक्ती, संयम आणि मागील चुकांमधून शिकण्याची वृत्ती यावर अवलंबून असते. त्यामुळे ऐकीव घटनांवर विसंबून न राहता आपल्या अभ्यासाने गुंतवणूकविषयक निर्णय घ्यावेत, असे ते सुचवतात. त्यांनी दिलेल्या निकषांमध्ये समजू शकेल अशी कंपनी; दीर्घकाळ चांगली कामगिरी करणारी करू शकणारी कंपनी; प्रामाणिक आणि कार्यक्षम व्यवस्थापन असणारी कंपनी आणि रास्त भावाने शेअर्स उपलब्ध असणारी कंपनी हे महत्त्वाचे निकष गुंतवणूकदारांनी पाळले पाहिजेत. डू नॉट कीप ऑल एग्ज इन वन बास्केट हे जगद्विख्यात तत्वज्ञान मात्र बफे यांना मान्य नाही. मर्यादित रक्कम उपलब्ध असेल तर गुंतवणूकदारांना अशा प्रकारचे डायव्हर्सिफिकेशन करता येत नाही, त्यामुळे सरधोपट तत्वज्ञानापेक्षा कौशल्यपूर्ण निर्णय घेऊन विशिष्ट ठिकाणी केलेली गुंतवणूकसुद्धा फायदेशीर ठरते, असे त्यांचे मत आहे.

या मांदियाळीतील चौथे तज्ज्ञ (सध्या वादळी चर्चेत असलेले) जॉर्ज सोरोस हे सर्वच बाबतीत वेगळे ठरतात. सर्वसाधारणपणे शेअर बाजार पूर्ण व योग्य माहितीच्या आधारावर चालतो आणि तो बरोबर असतो, असे समजले जाते. पण सोरोस यांच्या मते बाजारात सहभागी होणारे माहितीपेक्षा पूर्वग्रहावर आधारीत निर्णय घेतात आणि अचानक टोकाची प्रतिक्रिया देण्याकडे त्यांचा कल असतो. त्यामुळेच बाजार नेहमीच बरोबर असतो असे नाही, असे ते स्पष्ट करतात. म्हणूनच बाजाराच्या विरुद्ध दिशेचा विचार गृहीत धरावा आणि सर्वसाधारण कलाचे अनुकरण करू नये, असे त्यांचे मत बनले आहे. कंपन्यांची स्थिती, बाजारभाव, नियम हे सतत बदलत राहतात. त्यामुळे गुंतवणूकदारांनीही त्यांची पद्धत बदलत राहिले पाहिजे. तसेच आपला निर्णय चालू परिस्थितीत योग्य आहे का हे वारंवार तपासून पाहिले पाहिजे, असे त्यांचे मत आहे. भक्कम तर्कावर आणि विश्र्वासावर आधारित निर्णय घेतले नसतील तर बाजारात टिकाव लागत नाही असे ते स्पष्टपणे सुनावतात. काहीसा खटकणारा ‘इन्वेस्ट फर्स्ट, इन्वेस्टिगेट लेटर’ हा सल्ला त्यांनी दिलेला आहे तो प्रचलित विचारसरणीच्या बरोबर उलट आहे. परंतु तर्कशुद्ध असला तरी सामान्य गुंतवणूकदार प्रत्यक्षात असा सल्ला आचरणात आणू शकतील का, हा प्रश्र्नच आहे. मनातील सुप्त इच्छेचा मान राखून , तो निर्णय योग्य आहे असे मानून चांगले उत्पन्न देणार्‍या गुंतवणुकीच्या संधीत पैसे गुंतवा असे जॉर्ज सोरोस सांगतात. हळूहळू सुरुवात करावी, प्रगती काळजीपूर्वक तपासावी आणि निर्धाराने गुंतवणूक करावी, ही त्रिसूत्री त्यांनी मांडली आहे.

पंचायतनातील पाचवे आणि अपरिचित-अप्रचलित शेअर्समधील गुंतवणुकीतून संशोधन करून यशस्वी गुंतवणूकदार होणारे पीटर लिंच. त्यांच्या मते गुंतवणूक हा अभ्यासाचा आणि गांभिर्याने घेण्याचा विषय आहे. निकष ठरवणे सैद्धांतिक वाटेल परंतु तोच व्यवहार्य मार्ग आहे, असेही त्यांनी सुचवले आहे. आपण गुंतवणूक करताना स्वतःला तीन प्रश्र्न विचारले पाहिजेत- आपल्या स्वतःच्या मालकीचे घर आहे का? शेअर बाजारात गुंतवणूक करू इच्छित असलेल्या पैशांची मला दुसर्‍या कशासाठी गरज पडणार नाही ना? आणि माझ्याजवळ गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक असणारी गुणवैशिष्ट्‌ये आहेत का? हे ते तीन प्रश्र्न. यातील गुणवैशिष्ट्यांमध्ये संयम, सहनशक्ती, तटस्थता, खुला दृष्टिकोन, सातत्य, चूक मान्य करण्याची तयारी यांचा समावेश होतो. गुंतवणुकीमध्ये नुकसान झाले तर दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होणार नाही, इतकीच रक्कम गुंतवावी आणि त्यानंतर हळूहळू त्यात वाढ करावी असे ते सुचवतात. भारतीय गुंतवणूकदारांच्या दृष्टीने ही मनोवृत्ती अतिशय चपखल बसते. बाजारभावातील अल्पकालीन घसरगुंडी फारशी गांभीर्याने घेऊ नये आणि त्यामुळे विचलित होऊ नये असे ते म्हणतात. सामान्य गुंतवणूकदारांनी सट्टाबाजाराच्या नादाला लागू नये, असेही ते सांगतात. आपण ज्या शेअर्सची खरेदी करणार आहोत त्या कंपनीचे एका अंशाने का होईना आपण मालक होणार आहोत, यासाठी कंपनीची किमान माहिती असावी याकडे त्यांचा कटाक्ष असतो. कंपन्यांचे व्यवस्थापन आणि गुंतवणूकदारांची आपल्या चुकांपासून शिकत राहण्याची वृत्ती या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत, असे ते स्पष्ट सांगतात. तसेच प्रत्यक्षपणे शेअर बाजारात गुंतवणूक करण्यात येणार्‍या अडचणी लक्षात घेऊन सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून गुंतवणूक करावी असे पीटर लिंच म्हणतात.

गुंतवणूक पंचायतनातील या पाच देवतांना स्मरून गुंतवणुकीसंदर्भातील प्रत्येक निर्णय अभ्यासपूर्ण, भविष्यातील संभाव्य घडामोडींचा आढावा घेऊन, उपलब्ध असलेले पर्याय तपासून, नुकसान झाले तरी सहन करण्याची क्षमता बाळगून आणि दीर्घकालीन दृष्टिकोन ठेऊन साकल्याने घ्यावा त्यामुळे केवळ आपले नुकसान टळेल असे नव्हे तर दीर्घ कालामध्ये मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकतो, असे हे पुस्तक वाचल्यानंतर मत बनते. गुंतवणूकविषयक निर्णय हे ’गुंतागुंतीची वर्तणूक’ असे न बनता ‘गुंतुनी गुंत्यात सार्‍या पाय माझा मोकळा’ अशा पद्धतीने घेतले गेले तर मानसिक ताण तर येणार नाहीच परंतु त्यातून मिळणारे फायदे निश्र्चितपणे लाभदायक असतील, असे आशावादी चित्र हे पुस्तक देऊन जाते.
जगद्गुरू तुकोबाराय यांनी सांगितल्याप्रमाणे एक सूत्र कायम लक्षात ठेवावे. उत्तम व्यवहार करून धन जोडावे. ते गैरमार्गाने मिळवू नये. कुणाला फसवून, कुणाला लुबाडून मिळवू नये. शहाणपणाने नेटका, निर्दोष व्यवहार करावा आणि या पद्धतीनं धन मिळवावं. समृद्धी उभी करावी.

जोडोनिया धन उत्तम वेव्हारें ! उदास विचारें वेच करी

 

लेखक : चंद्रशेखर टिळक
आवृत्ती : नुकतीच 15वी आवृत्ती प्रसिद्ध
प्रकाशक : राजहंस प्रकाशन
पाने : 240
किंमत : 290 रुपये