गुरुमाई – वासंतीताई

तरुण भारत लाईव्ह जळगाव : येथील मू. जे. महाविद्यालयातील हिंदी विभागाच्या माजी प्रमुख, 83 वर्षीय प्रा. डॉ. वासंती साळवेकर यांचे गेल्या महिन्यात निधन झाले. यांच्या विद्यार्थिनी आणि मानसकन्या असलेल्या जळगाव आकाशवाणी केंद्राच्या सेवानिवृत्त, ज्येष्ठ उद्घोषिका डॉ. उषा शर्मा यांनी शब्दबद्ध केलेल्या डॉ. साळवेकर यांच्या आठवणी.

जणू प्रौढशिक्षणाचा वर्ग होता तो! उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एम. ए. हिंदीच्या पहिल्या बॅचच्या आम्ही सात विद्यार्थिनी. एम. जे. कॉलेजला गुरुमाई भेटल्या. सलग दोन वर्षे रोज प्रत्यक्ष भेटणारी माई काल-परवापर्यंत आईच्या रूपात सकाळी साडेचार ते रात्री उशिरापर्यंत व्हॉट्सअ‍ॅपवर भेटायची. तिला सर्वप्रथम प्रात: वंदन असायचं आणि ‘सुखी रहा’ या शब्दात तिच्या आशिर्वादाने दिवस सफल सुफल असायचा.

भारतीय आणि पाश्चात्य काव्यशास्त्र शिकवताना मन्मट, भट, आनंदवर्धन, लांजाइनस, दांते हे सारे गहन गुफेतील ऋषीमुनी वाटायचे, पण माईने आमच्या घरात, मनात सहज प्रवेश मिळवून दिला. प्रसादांची ‘कामायनी’ जितकी प्रासादिक तितकीच माईची प्रभुता आकर्षक. या महाकाव्यावर नृत्यनाटिकेचा विचार मनात आल्याक्षणी त्यांनी संहिता लिहिली.

महिमा मिश्रा हिने नृत्याची बाजू तर रवींद्र खासणीस यांनी संगीताची बाजू यशस्वीरित्या सांभाळली. निवेदनाचं भाग्य मला लाभलं. त्यावर्षी एम. जे. कॉलेजच्या गॅदरिंगला ही नृत्यनाटिका सादर झाली. ‘मंचावरती हिमालय… तिथं’ मनू श्रद्धा इडा इतक्या आकर्षक ठरल्या की, कडाक्याच्या थंडीत प्रेक्षक शेवटपर्यंत खिळून राहिले. नाटिकेचं रेकॉर्डिंग झालं. कॅसेट बनली. त्यानंतर मी त्याची सीडी बनवून पुण्याला पाठवली. शाबासकी मिळाली. खंत हीच की फोटोशूटमध्ये त्या लांबच राहिल्या.

आकाशवाणीवर त्यांची अनेक भाषणं प्रसारित झालीत. सौंदर्यशास्त्र, महाभारतातील पात्रं, संत तुकारामांची अभंग गाथा (पुढे हिंदी वाचकांसाठी अनुवादित केली). मराठी- हिंदी साहित्य अकादमीच्या सदस्या म्हणून मुलाखत दिली. स्टुडिओत फोटो काढू म्हटलं तर ‘नको’ म्हणाल्या.

रामकृष्ण मठ बेलूर (हावडा)च्या त्या दीक्षाप्राप्त अनुयायीनी म्हणून त्यांनी आम्हाला त्या आध्यात्मिक परिसरात जवळ-जवळ सात ते आठ दिवसांची अनुभूती मिळवून दिली. सकाळ-संध्याकाळ महाआरती आणि दिवसा शांतीनिकेतन, सुभाष बाबूंचा वाडा, कालीमाँचं दर्शन, दक्षिणेश्वर, कामारपुकूर, जयरामवारी असा तो रोमांचकारी दिनक्रम असायचा. आठवणी म्हणून अनेक ठिकाणी फोटो काढले. गंगेच्या विस्तृत पात्राची शपथ दिली पण माई फोटोपासून लांबच राहिल्या.

जन्म धुळ्याचा. शिक्षण पुण्याला. पण भडगाव, पाचोरा आणि जळगावला रमल्या. 1999ला निवृत्त झाल्यानंतर मात्र पुण्याला स्थायिक होण्याचा ठाम निर्णय घेतला. छोटासा फ्लॅट- त्यात एका खोलीत असंख्य पुस्तकांची दाटी, दुसर्‍या खोलीत अध्यात्म असा त्यांचा संसार. तो फ्लॅटदेखील रामकृष्ण मठ (पुण्याला) मरणोत्तर बहाल केला पुस्तकांसमवेत!

माझी ओळख झाल्यापासून सढळ हाताने सतत दान करताना मी पाहिलंय. विवेकानंद केंद्र कन्याकुमारी असो की बेलूर मठ! घरातील मोलकरीण असो की आप्तेष्ट नातेवाईक. माझ्या आजारपणात काही एकदा माझ्यासोबत असायच्या. सिंहगड ते कोंढवा मग मगरपट्टा, लांबचा पल्ला. पण माझ्यासाठी अनेक पुस्तकांसोबत यायच्या. पहिलं पुस्तक ‘मुक्तीगाथा महामानवाची’. मी आग्रह केल्यानंतर स्वलिखित पुस्तकं वाचायला, मन रमवायला, चिंतन, मनन करण्यासाठी चर्चेसाठी आणून दिलीत. ’स्वातंत्र्योत्तर हिंदी नाटकोमे मंचियता’, ’निबंध पुष्पांजलि’, काही अनुवादित पुस्तकं, काही यात्रावर्णन (मौली धरती मैला आकाश) वगैरे.. मला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्याबद्दल मिठाईच्या डब्यात दोन पुस्तकांचा संच कुरिअरने पाठवला. मागच्याच महिन्यात 10 भागातील ईशावास्थ उपनिषदांचा त्यांनी स्वतः हिंदी अनुवाद केलेला संच पाठविला. पुस्तक रूपाने त्या सतत भेटत राहिल्या. माझ्या कथासंग्रहाला आणि चौथ्या काव्यसंग्रहाला त्यांचे आशीर्वाद प्रद मनोगत मिळाले, ही माझ्यासाठी आत्यंतिक भाग्याची बाब.

प्रज्ञा भारती (प्रयाग), सरस्वती समम्यर्चना, साहित्य शिरोमणी (अलाहाबाद) अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित ही विदुषी सदैव प्रेरक होती. बीपी, डायबेटीस कुठलाच आजार नसताना गुडघेदुखीच्या त्रासानं परेशान होत्या. मला अजून लिखाण करायचं म्हणून ऑपरेशन अटळ… पण त्यांच्या शारीरिक शक्तीने कच खाल्ली. अगदी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतरही माझ्याशी बोलत. त्यांचा आवाज माझ्या मनात कंप निर्माण करायचा. पण शब्द स्पष्ट, ’मी बरी झाली की तुझ्याकडे येईन राहायला.’ ‘आपण पद्मालयला श्रींचं दर्शन घ्यायला पुन्हा जाऊ!’ पण ‘श्रीं’च्या भेटीला त्या एकट्याच गेल्या पुन्हा न येण्यासाठी… फोटोशूटसाठीचा हा अखेरचा प्रसंग लांबच राहिला.

डॉ . उषा शर्मा

मो.नं . ९५४५५५३९४७