एच-१बी व्हिसा : जुन्या व्हिसाधारकांना दिलासा तर नवीनची वाढली डोकेदुखी

---Advertisement---

 

अमेरिकेच्या एच-१बी व्हिसासाठीचे १ लाख डॉलरचे (सुमारे ८८ लाख रुपये) नवे शुल्क हे नव्या अर्जदारांसाठीच आहेत. सध्याचे H-1B व्हिसाधारक, नूतनीकरणासाठी अर्ज केलेले आणि २१ सप्टेंबरपूर्वी अर्ज केलेल्यांसाठी वाढीव शुल्क लागू होणार नाही, असे ट्रम्प प्रशासनाने स्पष्ट केले. परिणामी अमेरिकेबाहेर दौऱ्यावर तथा सुट्टीवर असलेल्या H-1B व्हिसाधारकांना तातडीने अमेरिकेत परतण्याची गरज नसून, मोठ्या संख्येने असलेल्या H-1B व्हिसाधारक भारतीयांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसासाठी तब्बल ८८ लाख रुपये शुल्क लागू करण्याचा आदेश दिल्यानंतर अमेरिकेतील या प्रकारच्या व्हिसाधारक भारतीयांमध्ये चिंता, संभ्रम आणि भीती पसरली होती. अनेकांनी दिवाळी, वर्षाअखेरिस तसेच कौटुंबिक कारणांसाठी भारतात जाण्याचा आपला बेत तातडीने रद्द केला.

अनेकांनी तर विमानतळावर चेक इनच्या रांगेत असताना आपला प्रवास रद्द केला. त्याचवेळी अमेरिकेबाहेर दौऱ्यावर तथा सुट्टीवर असलेल्या H-1B व्हिसाधारकांना २१ सप्टेंबरच्या रात्री १२ वाजेपूर्वी अमेरिकेत परतण्याच्या सूचना कंपन्यांनी दिल्या. यामुळे मोठी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. हा गोंधळ दूर करण्यासाठी H-1B व्हिसाच्या नव्या शुल्काबाबत व्हाईट हाऊसकडून सविस्तर माहिती देण्यात आली.

त्यानुसार १ लाख डॉलर्सचे नवे शुल्क हे वार्षिक नसून ते एकदाच व एकरकमी भरावे लागेल. नवे शुल्क नव्या अर्जदारांसाठी असेल. H-1B व्हिसा लॉटरी पद्धतीने देण्यात येतो. चालू वर्षातील लॉटरी प्रक्रियेद्वारे व्हिसा मिळणाऱ्यांना नवे शुल्क लागू नसेल. तर पुढील लॉटरी प्रक्रियेतील उमेदवारांवर ते लागू होईल. २१ सप्टेंबरपूर्वी या व्हिसासाठी अर्ज केलेल्या व्यक्तींना देखील जुनेच शुल्क लागू असेल. तसेच सध्या हा व्हिसा असलेल्या व्यक्ती देशाबाहेर असेल तर त्याला अमेरिकेत प्रवेश करताना कोणतेही अतिरिक्त शुल्क देण्याची गरज नाही.H-1B व्हिसाच्या नूतनीकरणासाठी अर्ज केलेल्या व्यक्तींना देखील जुनेच शुल्क लागू असेल. नव्या नियमांचा फटका बसण्याच्या भीतीने चिंताक्रांत झालेल्या विद्यमान H-1B व्हिसाधारक भारतीयांनी व्हाईट हाऊसच्या खुलाशानंतर सुटकेचा निश्वास सोडला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---