---Advertisement---
Ind vs Pak : १४ सप्टेंबर रोजी आशिया कप २०२५ च्या ग्रुप अ सामन्यात भारताने पाकिस्तानचा ७ विकेट्सने पराभव केला. त्यानंतर, भारतीय खेळाडू पाकिस्तानी क्रिकेटपटूंशी हस्तांदोलन केले नाही. यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) संतापला. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) तक्रार केली. आता, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) यावर आपले मौन सोडले आहे.
बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी हस्तांदोलन वादाबद्दल एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. त्यांनी म्हटले आहे की प्रत्येकाचे लक्ष भारताच्या विजयाचे सेलिब्रेशन करण्यावर असले पाहिजे, त्याभोवतीच्या वादावर नाही. आयएएनएसशी बोलताना सैकिया म्हणाले, “मी फक्त एवढेच म्हणू शकतो की टीम इंडियाने एक उत्तम विजय मिळवला. जास्त काही नाही, कमी काही नाही. एवढेच.
भारताने पाकिस्तानविरुद्ध सहज विजय मिळवला. आपण त्याचा आनंद घेतला पाहिजे. कोणत्याही देशाने निर्माण केलेल्या आवाजाकडे आपण लक्ष देऊ नये. आपल्याला त्याची चिंता वाटू नये.” आपल्या खेळाडूंच्या चांगल्या कामगिरीचे आपण कौतुक केले पाहिजे आणि त्यांचा अभिमान बाळगला पाहिजे, असे ते म्हणाले.
दुसरीकडे पाकिस्तानला सात विकेट्सने हरवल्यानंतर भारतीय संघाने आशिया कपच्या सुपर फोरमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादव यांनी या विषयावर भाष्य केले. ते म्हणाले की, आज आमचे सरकार आणि बीसीसीआय एकमताने आहेत. आम्ही येथे फक्त सामना खेळण्यासाठी आलो आहोत. त्याहून अधिक काही नाही.
या प्रकरणाबद्दल बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, हस्तांदोलनाचा कोणताही नियम नाही. जर तुम्ही नियमावली वाचली तर, विरोधी संघाशी हस्तांदोलन करण्याविरुद्ध कोणताही नियम नाही. हा फक्त संवादाचा एक प्रकार आहे. भारतीय संघाने या बाबतीत काहीही चुकीचे केलेले नाही.