आयपीएल २०२४ च्या खराब कामगिरीनंतर फिटनेस आणि निर्णयक्षमता यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतरही अष्टपैलू हार्दिक पांड्या याने टी-२० विश्वचषकात शानदार कामगिरी केली. भारताच्या जेतेपदात त्याने मोठे योगदान दिले. जेतेपदानंतर कर्णधार रोहित शर्मा याने या प्रकारातून निवृत्ती जाहीर केली तेव्हा उपकर्णधारपदाची जबाबदारी निभावणाऱ्या हार्दिककडे ही जबाबदारी सोपविली जाईल, असे सहज वाटले होते. मात्र त्याच्या जागी सूर्यकुमारला ही संधी मिळाली असून, त्याला उपकर्णधारपदही मिळालेले नाही. दुसरीकडे, त्याचे वैयक्तिक आयुष्य संकटांनी भरले, अलीकडेच तो पत्नी नताशा स्टॅनकोविकपासून वेगळा झाला आहे. या सगळ्यामध्ये हार्दिक पांड्याशी संबंधित आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.
पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाचे फक्त सहा एकदिवसीय सामने शिल्लक आहेत. तिसरा एकदिवसीय सामना श्रीलंकेत होईल आणि त्यानंतर भारताला पुढील तीन वनडे सामने जानेवारीत इंग्लंडविरुद्ध खेळायचे आहेत. मात्र हार्दिक पांड्याने श्रीलंका दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय घेतला आहे. अशा स्थितीत ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये हार्दिकच्या गोलंदाजीच्या तंदुरुस्तीबाबत साशंकता आहे.
वृत्तानुसार, पुढील काही महिने हार्दिक पांड्याच्या तंदुरुस्तीवर डोमेस्टिक क्रिकेटमध्ये बारकाईने लक्ष ठेवले जाईल. त्यानंतरच हार्दिक चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये खेळणार की नाही याचा निर्णय घेतला जाईल. बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, दुखापतीतून परतल्यानंतर हार्दिकने केवळ चार षटके टाकून T20 क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे, परंतु हार्दिकची दीर्घ फॉर्मेटमध्ये चाचणी झालेली नाही. त्यांच्या सहनशक्तीवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. वर्षअखेरीस होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये तो कशी कामगिरी करतो याकडे निवड समितीचे लक्ष असेल. हार्दिकला लाँग स्पेल टाकता येत नसेल तर त्याचा ताण वाढू शकतो.
हार्दिक पांड्याने 2023 च्या विश्वचषकादरम्यान बांगलादेशविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. या सामन्यात त्याला दुखापत झाली, त्यामुळे त्याला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. वर्कलोड मॅनेजमेंट लक्षात घेऊन सूर्याला टी-20 संघाचा कर्णधार बनवण्यात आला आहे, जेणेकरून पांड्याला वेळोवेळी विश्रांती देता येईल. त्याचबरोबर टी-२० आणि वनडेमध्ये उपकर्णधारपदाची जबाबदारी शुभमन गिलकडे सोपवण्यात आली आहे.