मुंबई : वातावरणातील बदलांचा परिणाम ऋतुमानावरही होत असून, यंदाचा उन्हाळा अतिकडक राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच अवकाळीचा फटकाही बसण्याची शक्यता आहे.भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार दक्षिण पॅसिफिक महासागरातील ‘अल निनो’ या समुद्र प्रवणतेच्या सक्रियतेमुळे मान्सूनच्या पर्जन्यावरही परिणाम होणार आहे. तसेच उन्हाळा अतिकडक राहील, अवकाळी पाऊस केव्हाही येऊ शकतो, पावसाळा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
उन्हाळ्याची तीव्रता अधिक असण्याच्या शक्यतेमुळे प्रशासनाकडून पाणीसाठ्याचे नियोजन, तसेच सर्वच रुग्णांलयात उष्माघाताच्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.‘अल निनो’चा प्रभावावर उपाययोजनांवर प्रशासनाकडून बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांनी कार्यशाळा घेऊन उष्माघात उपाययोजनासाठी स्थानिक स्तरावर करावयाच्या नियोजनाविषयी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, दिवसेंदिवस पारा वाढत असून विदर्भात बुलढाणा, ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर येथील उष्मा वाढतच असून शनिवारी राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपूर येथे ३८ अंश सेल्सिअस इतकी नोंदली गेली आहे. येत्या काही दिवसांत पारा चाळीशी गाठणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.