तरुण भारत लाईव्ह न्युज धुळे : तालुक्यातील जुनवणे येथे शेतात काम करीत असलेल्या शेतकर्याच्या अंगावर वीज कोसळल्याने शेतकर्याचा मृत्यू ओढवला तर महिला गंभीर जखमी झाली. शनिवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. ज्ञानेश्वर नागराज पाटील (48) या शेतकर्याचा या घटनेत जागीच मृत्यू झाला तर केवळबाई देवराम मोरे (पाटील) यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शेतातच ओढवला मृत्यू
धुळे तालुक्यात अनेक भागात शनिवारी सायंकाळी अचानक जोरदार वारा सुरू झाल्यानंतर पावसाला सुरूवता झाली तर जुनवणे शिवारातील शेतातील काही कामे आटोपण्यासाठी गेलेले ज्ञानेश्वर पाटील (48, जुनवणे) यांच्या अंगावर वीज पडताच त्यांचा जागीच मृत्यू झाला तर केवळबाई मोरे या गंभीर जखमी झाल्या. दरम्यान, मयत पाटील यांची जुनवणे शिवारात त्यांची शेती असून शेतात गहू पिकाची काढणी सुरू होती. त्याठिकाणी गावातील काही जण त्यांच्या सोबत शेतात गेले असता शनिवारी सायंकाळच्या सुमारास अचानक वारा सुरू झाला. पावसाचे वातावरण तयार होवून पावसासोबत वीज कोसळली. ही वीज ज्ञानेश्वर पाटील आणि केवळबाई देवराम मोरे (पाटील) यांच्या अंगावर कोसळली. त्यांना तातडीने जखमी अवस्थेत धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.
धुळे तालुका पोलिसात नोंद
हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी ज्ञानेश्वर पाटील यांना तपासून मृत घोषित केले तर केवळबाई यांच्यावर उपचार सुरू आहेत. शिक्षक दामोदर नवल पाटील ( 43, रा.जुनवणे, ता.धुळे) यांनी दिलेल्या खबरीवरून धुळे तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.