धरणगाव : लग्नातील मानपान, डामडौल, अकारण होणारा दिखाऊ खर्च या साऱ्यांमुळे सर्वसामान्य माणसाला लग्नकार्य म्हणजे जणू एक अग्निदिव्यच होऊन बसले आहे. वधू पित्याला लग्नकार्य करणे म्हणजे डोक्यावर कर्जाचा बोझा चढवून घेणे बनलं आहे. या साऱ्या गोष्टींना फाटा देत येथील भागवत आणि संभाजी नगरच्या दिल्लीवाले परिवाराने एक नवा आदर्श घालून दिला आहे. दोन्ही कुटुंबांनी क्रांतिकारी निर्णय घेत मुलगी बघायच्या दिवशीच लग्न लावून, मुलगी पाहायला आले आणि विवाह करून गेले..। ही उक्ती खरी करून दाखविली.
येथील गोपाल रवींद्र भागवत यांची सुकन्या आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रवींद्र भागवत यांची नात, मनीषा आणि गोपाल भागवत यांची ज्येष्ठ कन्या चि. सौ. कां. पौर्णिमा उर्फ स्वामिनी आणि संभाजी नगर येथील हितेश विश्वनाथ दिल्लीवाले यांचे पुत्र निखिल यांचा रविवारी (११ मे) मुलगा-म लगी बघण्याचा कार्यक्रम धरणगाव येथे होता. सर्वयोग जुळून आले. मुला-मुलींची पसंती झाली. चर्चा, सूचना, सल्लामसलत, रीतीरिवाज इत्यादी सर्व गोष्टी रीतसर पार पडल्यात.
लालगंधाच्या (साखरपुडा) कार्यक्रमाची तयारी सुरू झाली. लग्नाची तारीख ठरविण्याची चर्चा सुरू झाली. यंदाच बहिणीचा विवाह झाल्यामुळे आपलं लग्न उशिरा करू, असा प्रस्ताव नवरदेवाने ठेवला. यानंतर काही धुरीणांनी एकत्र येत नवा विचार मांडला. लग्न लांबणीवर न टाकता त्याच दिवशी गोरजमुहूर्तावर लग्न कां पार पाडू नये? असा एक विचार मांडला. त्यावर चर्चा झाली. घरातील महिला वर्ग, ज्येष्ठ-बुजर्गांची समजूत घालून नव्या पिढीने नवा पायंडा पाडला आणि त्याच रात्री शिंपी समाज मंगल कार्यालयात गोरज मुहूर्तावर दोघांचा आनंदात व थाटामाटाने विवाह पार पडला. चट्ट मंगनी पटू शादी, दोनो घरो में आबादानी…! असं म्हणत उपस्थितांनी वधूवरांना आशीर्वाद दिले आणि एक आदर्श विवाह अल्पावधीत, जुजबी खर्चात, मानपान टाळून संपन्न झाला.
हा आदर्श विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी रमेश भागवत, सुरेश भागवत, दोंडाईचा येथील दिनेश हजारे, धुळे येथील चंद्रकांत हजारे, चंद्रकांत सोनवणे, मनोज सोनवणे, सुदर्शन भागवत, सचिन भागवत आणि संपूर्ण भागवत परिवाराने परिश्रम घेतले. लग्न आजच करण्याचे ठरल्यानंतर म हत्त्वाचा विषय होता बस्ता, जेवणावळ आणि खर्चाचा. यासाठी मदतीला धावून आले ते भाचे मंडळी… दोंडाईचा येथील भाचा चंदन हजारे याने वधूवरांचा बस्ता करून दिला. भुसावळ येथील भाचा कृणाल शिंदे यांनी जेवणावळीची, धुळ्याचे भाचे दुर्गेश आणि समर्थ हजारे यांनी हारतुऱ्यापासून सर्वच जबाबदारी घेतली. शिंपी समाजाने आपले मंगल कार्यालय उपलब्ध करून दिले. यानंतर समाजातील तरुणांनी अशक्य वाटणारी गोष्ट अल्पावधीत शक्य करून दाखवली.
या अनोख्या विवाहाची चर्चा गावात वाऱ्यासारखी पसरली आणि ज्येष्ठ उद्योगपती सुरेश चौधरी, चर्मकार समाजाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे, प्रा. बी. एन. चौधरी, माजी नगराध्यक्ष नीलेश चौधरी, भाजपचे गटनेते कैलास माळी, राष्ट्रवादीचे नेते दीपक वाघमारे, शिवसेनेचे शहरप्रमुख विलास महाजन, तौसिफ पटेल, सोनू पटेल, राजेश मकवाने यांच्यासह अनेक मान्यवरांनी विना निमंत्रण विवाह सोहळ्याला उपस्थित राहून वधूवरांना शुभाशीर्वाद दिले. संपूर्ण शहरासह तालुक्यात या आदर्श विवाहाची चर्चा सुरू आहे.