जळगाव : मामाकडे शिक्षणासाठी राहत असलेल्या मुलाचा कालव्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना जामदा येथे घडली. मयूर नरेंद्रसिंग ठाकरे असे मयत मुलाचे नाव आहे. मयूर हा एकुलता एक मुलगा असून त्याच्या जाण्याने कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयूर हा भडगाव तालुक्यातील महिंदळे येथे मामाकडे शिक्षणासाठी राहत होता. तो सुटीच्या दिवशी मामांना मदत म्हणून शेतात जायचा. तो शेतात गेला असता बैलांना पाणी पाजण्यासाठी कालव्यावर गेला. यावेळी त्याचा पाय घसरल्याने कालव्यात पडला.
पोहता येत नसल्याने त्याचा पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. बैल घेऊन जाऊन बराच वेळ झाल्यामुळे शोधाशोध केल्यावर काही अंतरावर तो सापडला. त्याला गावकऱ्यांनी तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल कैलास गिते व दत्ता मगर करत आहेत.
एकलुता मुलगा
गणेशपुरा (जि. धुळे) येथील नरेंद्रसिंग ठाकरे यांचा मुलगा मयूर याला शिक्षणासाठी आजी– बाबा व मामाकडे ठेवले होते. तो दहावीपासून येथे शिक्षण घेत होता. आई वडील पोटाची खडगी भरण्यासाठी आंबरनाथ मुंबई येथे वास्तव्यास होते. तो यावर्षी सु. गि. पाटील महाविद्यालयात बीएसस्सीच्या अंतिम वर्षाला होता. परीक्षा संपल्यावर दोन दिवसांनी तो आई वडिलांकडे जाणार होता.