---Advertisement---
Darren Sammy : गेल्या आठवड्यात अनेक स्टार खेळाडूंनी निवृत्तीची घोषणा केली आहे. यामध्ये एक नाव म्हणजे वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज निकोलस पूरन. ज्याने वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार आणि सध्याचे मुख्य प्रशिक्षक डॅरेन सॅमी यांनी निकोलस पूरनच्या या निर्णयाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. तसेच आणखी बरेच खेळाडू निवृत्तीचा निर्णय घेऊ शकतात, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.
पूरन हा वेस्ट इंडिजसाठी टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने अद्याप एकही कसोटी सामना खेळला नव्हता. त्याच्या या निर्णयाने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. कारण टी-२० विश्वचषक फक्त आठ महिन्यांवर येऊन ठेपला आहे. त्याच्या या निर्णयामागे फ्रँचायझी क्रिकेट हे सर्वात मोठे कारण मानले जात आहे. तो फ्रँचायझी क्रिकेटमधून सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. अशा परिस्थितीत, डॅरेन सॅमीचा असा विश्वास आहे की येणाऱ्या काळात, आणखी काही खेळाडू या मार्गाचा अवलंब करू शकतात.
पूरनच्या निवृत्तीबद्दल सॅमी म्हणाला, ‘माझा आतला आवाज मला सांगत होता की असे काहीतरी घडेल. आदर्शपणे, मी अशा प्रतिभेला संघात ठेवू इच्छितो. पण मी कोणाच्याही कारकिर्दीवर नियंत्रण ठेवू शकत नाही. मी त्याला शुभेच्छा दिल्या, त्याने संघाला शुभेच्छा दिल्या. आता निकोलस पूरनशिवाय रणनीतीवर पुढे जाण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विश्वचषक येत आहे, त्याने आम्हाला आधीच सांगितले होते, याचा मी आदर करतो जेणेकरून त्याच्याशिवाय आम्हाला नियोजन करण्यासाठी अधिक वेळ मिळेल.’
टी-२० क्रिकेटच्या वाढत्या ट्रेंडमुळे आणि फ्रँचायझी लीगच्या आकर्षणामुळे अधिक खेळाडू लवकर निवृत्त होऊ शकतात, असा अंदाजही सॅमीने व्यक्त केला. त्यांनी हेनरिक क्लासेन आणि क्विंटन डी कॉक सारख्या दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंचे उदाहरण दिले. सॅमी म्हणाला, ‘मला खात्री आहे की अधिक खेळाडू या दिशेने वाटचाल करतील. तुम्ही पाहिले की प्रत्येकजण हेनरिक क्लासेन, क्विंटन डी कॉक, निवृत्त झालेल्या या खेळाडूंबद्दल बोलत आहे. हे आमच्या नियंत्रणाबाहेर आहे.’