धुळे । देवपूर पोलिस ठाण्यात बदली होऊन आलेल्या व ७० हजार रुपये पगार असलेल्या हेडकॉन्स्टेबलला तीन हजारांची लाच घेताना रंगेहाथ ताब्यात घेतले. विशेष पोलिस ठाण्यातच ही कारवाई झालीय असून एजाज शेख असे या पोलिसाचे नाव आहे. नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.
याप्रकरणी उशिरापर्यंत देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. देवपूर परिसरात एक नागरिक चारचाकीवर सोडा गाडीचा व्यवसाय करतो. याप्रकरणी कारवाई न करण्यासह सोडा गाडी चालू ठेवण्यासाठी हेडकॉन्स्टेबल एजाज अजिमुद्दीन काझी वय ५२) यांनी चार हजारांची मागणी केली होती. या प्रकरणी संबंधित नागरिकाने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर नाशिकचे पथक मंगळवारी धुळ्यात आले. त्यानंतर त्यांनी काझी यांना देवपूर पोलिस ठाण्यात लाच घेताना रंगेहाथ पकडले. तसेच चौकशीसाठी साक्रीरोडवर असलेल्या गुलमोहर रेस्ट हाऊसमध्ये नेले.