Breaking : लाच स्वीकारताना मुख्याध्यापकाला रंगेहात पकडले ; एरंडोल तालुक्यातील प्रकार

एरंडोल । जळगाव जिल्ह्यातून लाचखोरीच्या मोठी बातमी समोर आलीय.थकीत वेतनातील फरकाची रक्कम मंजूर करण्याच्या मोबदल्यात तडजोडीअंती दहा हजारांची लाच मागून स्वीकारताना मुख्याध्यापकाला जळगाव एसीबीने कारवाई करत रंगेहाथ पकडल्याने जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. संदीप प्रभाकर महाजन (44) असे लाचखोर मुख्याध्यापकाचे नाव आहे.

काय आहे प्रकरण?
याबाबत असे की, एरंडोल तालुक्यातील निपाणेतील श्री संत हरिहर हायस्कूलमध्ये 33 वर्षीय तक्रारदार शिपाई आहेत. त्यांच्या मागील प्रलंबित वेतन निश्चितीच्या फरकाची रक्कम दोन लाख 53 हजार 670 रुपये मंजूर करण्याचा प्रस्ताव वेतन अधीक्षक, माध्यमिक शिक्षण विभाग जळगाव यांच्याकडे पाठवण्यात आला. प्रस्ताव मंजुरीचे काम आरोपी महाजन यांनी स्वतः च्या ओळखीने करून दिले होते.

त्याचा मोबदला म्हणून मंजुर रकमेच्या पाच टक्केप्रमाणे 12 हजार पाचशे रुपये लाचेची मागणी मुख्याध्यापक यांनी 25 जून रोजी केली व त्याबाबत तक्रार नोंदवण्यात आली. पडताळणीत तडजोडीअंती दहा हजार रुपयांची लाच स्वीकारण्याचे मुख्याध्यापकाने मान्य केल्यानंतर गुरुवार, 27 जून रोजी सापळा रचण्यात आला.गुरुवारी दुपारी मुख्याध्यापकाला लाचेची रक्कम तक्रारदार शिपाई यांच्याकडून घेताच एसीबीने ताब्यात घेतल्याने शाळेच्या वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली.