हेल्दी ‘लच्छा पराठा’; घरी नक्की ट्राय करा

तरुण भारत लाईव्ह । २३ मे २०२३। बरेचदा गृहिणींसमोर संध्याकाळी नाश्त्याला काय बनवायचं असा प्रश्न पडतो. तुम्हालाही असा प्रश्न पडला असेल, तर तुम्ही लच्छा पराठा हा पर्याय निवडू शकता. हा पदार्थ उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो असे म्हटले जाते. झटपट बनणारे लच्छा पराठे बनवण्यासाठी मोजून ३ ते ४ गोष्टी लागतात. चला तर मग हा टेस्टी आणि हेल्दी पराठा कसा बनवायचा हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

साहित्य 
२ कप गव्हाचे पीठ, ३ ते ४ चमचे तूप, १/४ टीस्पून मीठ.

कृती 
सर्वप्रथम, एका भांड्यामध्ये गव्हाचे पीठ घ्या. त्यामध्ये पाणी घालून ते मळून घ्या. पुढे त्यात मीठ टाका. पीठ मऊ होईपर्यंत मळून घ्या. थोड्या वेळाने ते हाताने मळा. त्यावर १/२ टीस्पून तेल लावा. जेणेकरुन पीठ कोरडे राहणार नाही. पुढे त्यावर कपडा टाकून ते झाका. १५ मिनिटांनंतर कपडा बाजूला काढून ते पीठ पुन्हा मळून घ्या. मळलेल्या पीठाचा एक मोठा गोळा घेऊन लाटा. त्यावर १ ते १.५ चमचा तूप लावा आणि थोडसं पीठ लावा. छोट्या-छोट्या आकारात दुमडा. त्यानंतर बोटांनी ती पोळी दाबा, जेणेकरुन तिची लांबी वाढेल.

आता ती लांबट पोळी एका दिशेला गोल फिरवून तिचे गोळे तयार करा. असे ३-४ गोळे बनवून ते ५-१० मिनिटांसाठी झाकून ठेवा. पुढे गोळे व्यवस्थितपणे लाटून घ्या आणि पॅनवर टाकून शिजवा. पॅनमध्ये गरम करताना त्यावर तूप टाकायला विसरु नका. अशा प्रकारे झाला लच्छा पराठा तयार..