५४ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांकडे ‘या’ तारखेला होणार सुनावणी

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेच्या (Shivsena) आमदारांच्या (MLA) अपात्रतेचे (Disqualification) प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे दिले होते. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी सर्व आमदारांना नोटीस बजावत आपले म्हणणे मांडण्याची सूचना केली होती. यानंतर आता विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेच्या घटनेचा अभ्यास केल्यानंतर या प्रकरणाची प्रत्यक्ष सुनावणी विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात १४ सप्टेंबरला घेण्यात येणार आहे.

एकाच दिवशी सर्व आमदारांची सुनावणी होणार असून तब्बल ३४ याचिकांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुनावणी घेणार आहेत. त्यामुळे शिवसेनेचे ५४ आमदार या सुनावणीसाठी (Hearing) एकाच छताखाली येणार आहेत. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह त्यांच्यासोबत असलेले सगळे आमदार आहेत. तसेच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत असलेल्या आमदारांचीही सुनावणी होणार आहे. वादी व प्रतिवादी आमदारांना पुरावे सादर करत म्हणणे मांडण्याची संधी देण्यात येणार आहे. तर प्रत्येक याचिकेची वेगळी सुनावणी केली जाणार असून त्यावेळी संबंधित आमदारांना बोलावले जाणार आहे.

विधानसभा अध्यक्षांकडे आलेल्या याचिकेच्या सुनावणीवेळी आमदारांना आपले म्हणणे मांडायला संधी देण्यात येणार आहे. त्यानंतर आमदार आपले पुरावे सादर करतील, तसेच एकमेकांना पुराव्याचे पेपर सुद्धा देतील. यानंतर विधिमंडळातील सर्व आमदारांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर प्रत्येक याचिकेची वेगळी मांडणी करण्यात येईल.

विधिमंडळात १४ सप्टेंबरला दिवसभर सुनावणी चालणार असून प्रत्येक याचिकेला (Petition) वेळ ठरवून दिला जाणार आहे.  त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.