मुंबई : केवळ महाराष्ट्राचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाची आज विधानसभेत दुसरी सुनावणी आज दुपारी ३ वाजता होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या प्रकरणाची पहिली सुनावणी १४ सप्टेंबर रोजी झाली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर सोमवारी म्हणजेच आज या प्रकरणाची दुसरी सुनावणी घेतली जाणार आहे.
सुनावणीसाठी ठाकरे गटाच्या १४ तर शिंदे गटाच्या ३९ आमदारांना नोटीस पाठवण्यात आली आहे. या सुनावणीत या प्रक्रियेची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे. तसेच या प्रकरणाच्या सुनावणीचं वेळापत्रक देखील समोर येण्याची शक्यता आहे. या वेळापत्रकानुसार या प्रकरणातील सुनावणी प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती आहे.
विधानसभेतील आजच्या सुनावणीत सर्व आमदारांना हजर राहण्याची आवश्यकता नसेल. मात्र, शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटाच्या वकिलांकडून उद्याच्या सुनावणीमध्ये बाजू मांडली जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील सुनावणीमध्ये विधानसभा अध्यक्षांना या सगळ्या आमदार अपात्रता प्रकरणांमध्ये मागील चार महिन्यांमध्ये नेमक काय केलं, याचा तपशील सादर करावा लागणार आहे. न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना कालमर्यादेत सुनावणी घेण्यासंदर्भात स्पष्ट निर्देश दिले होते.
मागील सुनावणीत काय झाले?
विधानसभेत १४ सप्टेंबरला पार पडलेल्या सुनावणीत शिंदे गटाकडून ठाकरे गटाच्या याचिका मिळाल्या नसल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे याचिकांचा अभ्यास करण्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी १७ दिवस पुढील तारीख सुनावणीसाठी निश्चित केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर तातडीने आज ही सुनावणी पार पडत आहे.