जळगाव : फोनवर बोलताना अचानक खाली कोसळून मृत्यू झाल्याचे आपण वाचले असलेच, अशीच एक घटना जळगावच्या जामनेर मध्ये घडली आहे. भावाशी व्हिडिओ कॉलवर बोलत असताना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि बहिणीचा मृत्यू झाला आहे. अंजली विजय भामेरे (वय ४० वर्ष) असं मयत महिलेचं नाव आहे. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. या या दुर्दैवी घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
जामनेर तालुक्यातील पहूरपेठ येथे अंजली भामेरे या कुटुंबासह वास्तव्यास होत्या. शुक्रवारी दुपारी अंजली नेहमीप्रमाणे घरकाम करत होत्या. यावेळी त्यांच्या मोबाईलवर जळगावमध्ये राहणारा भाऊ रवी वडनेरे यांचा व्हिडीओ कॉल आला. फोनवर बोलता बोलता त्या घर झाडत होत्या.
दरम्यान अचानक त्या जमिनीवर कोसळल्या. हे पाहून अंजली यांचा लहान मुलगा हर्षल धास्तावला. आई अचानक काम करता करता खाली कशी पडली हे पाहून त्याने जोरात आरोळी ठोकली. त्याच्या आरोळीने घरातील नातेवाईकांनी तसेच शेजाऱ्यांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. शेजारी बाळू भामेरे यांनी तातडीने डॉक्टरांना बोलावले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. अंजली भामेरे यांनी जगाचा निरोप घेतला होता. अंजली भामेरे यांचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे समोर समोर आले आहे.
अचानक फोनवर बोलता बोलता बहिणीला काय झाले म्हणून फोनवर बोलणारा भाऊ रवी हा प्रचंड गोंधळला होता. काही तासाने त्याला बहिणीच्या मृत्यूची बातमी कळाल्यानंतर त्याने प्रचंड आक्रोश केला. रवी याचा बहिणीसोबत व्हिडीओ कॉलद्वारे केलेला संवाद हा अखेरचा ठरला आहे.
मयत अंजली यांच्या पश्चात पती, दोन मुले असा परिवार आहे. अंजली यांच्या पतीचा दीड वर्षांपूर्वी मोठा अपघात झाल्याने त्यांना दिव्यांगत्व आले आहे. अंजली यांचा मोठा मुलगा प्रणव याने नुकतीच बारावीची परीक्षा दिली आहे. तर लहान मुलगा प्रणव हा पहिलीत शिक्षण घेतो.
दिव्यांग असलेल्या विजय भामेरे यांनी परिस्थितीवर मात करत संघर्ष सुरु केला असताना दुसरकीडे त्यांच्या पत्नीच्या अचानक झालेल्या मृत्यूने त्यांच्यावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. दोन्ही मुलांची जबाबदारी ही विजय भामेरे यांच्यावर येऊन ठेपली आहे.