तरुण भारत लाईव्ह । १५ एप्रिल २०२३। जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खासगी बसला भीषण अपघात झाला आहे. खासगी बस थेट दरीत कोसळली आहे. पहाटे 4 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात सुमारे १३ लोकांचा मृत्यू झाला. पुण्याहून मुंबईला ही बस निघाली होती, तेव्हा चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला. दरम्यान, अपघाताबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी दुःख व्यक्त केले तसेच अपघातातील प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना मदत जाहीर केली आहे.
सूत्रानुसार, लोणावळ्याजवळ बोरघाट परिसरातील शिंगरोबा मंदिराजवळ पहाटे 4 वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. पुण्याहून मुंबईला ही बस निघाली होती, तेव्हा चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला. खासगी बस ५०० फूट खोल दरीत कोसळली. हा अपघात अत्यंत भीषण असून त्यात अंदाजे २५ लोक जखमी झाले. प्रवासी गाढ झोपेत असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला. आत्तापर्यंत 16 जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. आणखी आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. जखमी प्रवाशांना खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
घटनास्थळी दाखल होऊन स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केलं. अपघातातील जखमींना बाहेर काढलं जात आहे. रात्रीचा अंधार असल्याने या बचावकार्यात अडथळे निर्माण होत होते. मात्र, उजाडताच या मदतकार्याच्या कामास वेग आला आहे. क्रेन मागवून बस बाजूला केली जात आहे.
शिंदेंकडून मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयाप्रति सहवेदना प्रकट करुन मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 15, 2023