---Advertisement---

हृदयद्रावक! खेळताना गिरणीत पडल्याने चिमुरड्याचा मृत्यू

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह । २७ मे २०२३। नाशिक मधून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. बेकरीतले पदार्थ तयार करण्याच्या गिरणीत अडकल्याने डोक्यापासून पायापर्यंतची सर्व हाडे मोडल्याने पंचवटीतील इंद्रकुंड परिसरातील तीन वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. रिहान उमेश शर्मा (रा. हिमालय हाउस, इंद्रकुंड) असे मृत बालकाचे नाव आहे.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, बेकरीचे पदार्थ एकत्रित करण्यासाठी वापरण्यात येणारी गिरणी बंद होती. तिथे खेळताना तोल जाऊन रिहान गिरणीत पडला. त्याच्या धक्क्याने गिरणी सुरू झाल्याने त्यातील पात्यांसह बेल्टमध्ये अडकून रिहानचे पूर्ण शरीरच फ्रॅक्चर झाले. त्याच्या किंकाळ्यांमुळे कुटुंबीयांनी धाव घेत त्याला बाहेर काढले. त्वरित खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तेथे उपचारांदरम्यान रात्री पावणेबारा वाजता त्याला मृत घोषित करण्यात आल्यानंतर कुटुंबीयांनी फोडलेला टाहो उपस्थितांना हेलावून गेला. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात त्याच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. रिहान हा शर्मा यांचा एकुलता मुलगा होता. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---