तरुण भारत लाईव्ह । ८ मार्च २०२३। पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. छोट्याश्या गोष्टीवरून सासूने आपल्या सुनेचा जीव घेतल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी जाऊन पाहणी केल्यानंतर सासूला अटक करण्यात आली.
सूत्रानुसार. सुनेला घरकाम जमत नसल्याच्या कारणाने तसेच ती नातवाला व्यवस्थित सांभाळत नसल्याचा आरोप करुन सासू कमला तिचा छळ करत होती. दोन दिवसांपूर्वी स्वयंपाकघरातील फ्रीज उघडताना रितूला पाय लागल्याने वाद झाला होता. त्या वेळी रितूने सासू कमलाशी वाद घातला. त्यानंतर कमलाने रितूला मारहाण केली. तिचे डोके फरशीवर आपटले. या घटनेत रितुच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
रितू रवींद्र माळवी असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. सासू कमलाची चौकशी करण्यात आली. तेव्हा तिने सुनेला बेदम मारहाण करुन तिचा खून केल्याची कबुली दिली. या प्रकरणी सासू कमला प्रभुलाल माळवी (वय ४९ वर्ष) हिला अटक करण्यात आली आहे.