चाळीसगाव : काही दिवसापूर्वीच जामनेर तालुक्यात मुलीच्या लग्नाच्या हळदीत नाचताना वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला होता. त्यानंतर आता आनखी एक दुर्दैवी घटना समोर आलीय. पुतण्याच्या लग्नासाठी सुरत येथील चाळीसगाव तालुक्यातील आडगाव येथे आलेल्या काकासोबत अघटित घडलं. लग्नाच्या एक दिवस आधी देव नाचवण्याच्या कार्यक्रमात नाचताना नवरदेवाच्या काकांना हृदयविकाराचा झटका आल्याने दुर्देवी मृत्यू झाला आहे. पुतण्यावर अक्षता टाकण्यापूर्वी काकांच्या मृत्यूच्या या घटनेने सर्व गाव सुन्न झालंआहे. दिनकर मोहन मिस्तरी (वय ४५, रा. सुरत) असं मयत काकांचे नाव आहे.
मूळचे चाळीसगाव तालुक्यातील आडगाव येथील रहिवासी असलेले दिनकर मिस्तरी हे चार भाऊ होते. दिनकर आणि त्यांचा भाऊ सुरेश हे दोघेही काही वर्षांपूर्वी व्यवसायानिमित्ताने सुरत येथे परिवारासह स्थायिक झाले होते. तर त्यांचे इतर दोन भाऊ अरुण व संजय हे आडगावातच राहत होते. दिनकर यांचे भाऊ संजय यांचेच कुटुंबिय आडगावात वास्तव्यास आहे. दिनकर मिस्तरी यांचा पुतण्या भूषण मिस्तरी याचा २७ फेब्रुवारी रोजी म्हणजे कालच विवाह निश्चित झाला होता.
या विवाहासाठी दिनकर मिस्तरी व त्यांचा भाऊ सुरेश हे दोघेही आपल्या परिवारासह आठवडाभरापूर्वीच सुरत येथून आडगावात आले होते. २६ रोजी सायंकाळी पुतण्या भूषणला हळद लागली. रात्री अंगणात मोठा मंडप टाकला. रात्री पाहुण्यांचे जेवण वगैरे झाल्यानंतर देव नाचवण्याचा कार्यक्रम सुरु झाला. या कार्यक्रमात वधु आणि वर अशा दोन्हींकडची मंडळी उपस्थित होती.
यावेळी भूषण याचे काका दिनकर हे अगदी साडी नेसून सर्वांना लाजवेल असे नाचत आनंद लुटत होते. मात्र, नाचता नाचता दिनकर मिस्तरी यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. या झटक्यात रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. सोहळ्याला उपस्थित नातेवाईकांसह सर्व गाव सुन्न झालं.
कुटुंबातील इतरांना मानसिक धक्का बसू नये म्हणून दिनकर यांच्या मृत्यूची घटना काही काळासाठी पुतण्या तसेच इतरांकडून लपवून ठेवण्यात आली होती. थोडे बरे वाटत नाही म्हणून त्यांना चाळीसगाव येथील रुग्णालयात नेण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. दुसऱ्या दिवशी आडगावनजीक असलेल्या उंबरखेड या गावानजीक सोमवारी सकाळी ९ वाजता कानुबाई मातेच्या साक्षीने साध्या पध्दतीने भूषणचा विवाह पार पडला. त्यानंतर दुपारी दोन वाजता भूषणचे काका दिनकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दिनकर यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.