राज्यात उष्णतेत पुन्हा वाढ होणार; कशी घ्यावी काळजी?

तरुण भारत लाईव्ह ।९ मार्च २०२३। राज्यातील तापमानात चार ते सहा अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. तर आज कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. या वाढत्या तापमानात स्वतःची काळजी कशी घ्यावी आणि उन्हापासून बचाव कसा करावा हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

राज्यात तापमानात सातत्यानं चढ उतार होत आहे. राज्यातील तापमानात चार ते सहा अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. तर कोकणात आज उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. त्यामुळं आंबा, काजू पिकावर परिणाम होण्याची शक्यता आहे. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील काही भागात उष्माघाताचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांना घराबाहेर पडताना काळजी घेणं गरजेचं आहे.

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आठ आणि नऊ मार्च रोजी कमाल तापमानापेक्षा 4 ते 5 अंश सेल्सियसने अधिक तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवली होती. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तापमानात वाढ झाल्यास फळांसह, भाजीपाल्यावर परिणाम होऊ शकतो. आंबा आणि काजूच्या पिकाला देखील वाढत्या उष्णतेचा फटका बसण्याची शक्यता आहे.

कशी घ्यावी काळजी?
जास्तीत जास्त पाणी प्यावे. दुपारच्या वेळी घराबाहेर जाणं टाळावे. जर उन्हाळ्यात शरिराचे तापमान सतत वाढत असेल, डोके दुखी, चक्कर येणे, अशक्तपणा, मळमळ किंवा निराशपणा जाणवत असेल तर त्वरीत डॉक्टरांकडे जावे. दुपारी 12 ते दुपारी 3 या दरम्यान घराबाहेर उन्हात जाऊ नका. सतत पाणी पीत राहा जेणेकरुन शरीर हायड्रेट राहिल. घरात तयार केलेले लिंबू-पाणी, छास, लस्सी, ज्यूस याचं जास्तीत जास्त सेवन करा. टरबूज, कलिंगड, संत्रा यासारख्या फळांचं सेवन करा. तसेच सुती कपडे परिधान करा. उन्हात जाताना डोकं झाका म्हणजे उन्हापासून बचाव होईल.