Heatstroke news : गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी या तळपत्या सूर्याच्या दाहकतेने नागरिक हैराण झाले असून, उष्माघाताने काहींना मृत्यू सामोरे जावे लागल्याचे समोर आले आहे. आता अशीच एक घटना समोर आली असून, १२ वर्षीय विद्यार्थ्याचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. दरम्यान, या घटनेनंतर प्रशासनही खडबडून जागं झालं असून, प्रशासनाकडून नागरिकांना काही महत्त्वाच्या सूचना खबरदारीचा उपाय म्हणून केल्या जात आहेत.
जळगाव जिल्ह्यात एकाचा मृत्यू
एरंडोल तालुक्यातील धारागीर येथील भास्कर निंबा पाटील (वय ६५) हे गृहस्थ रिद्धी टी सेंटरच्या १०० मीटर अंतरावर मलकापूर ते मुक्ताईनगरकडे जाणाऱ्या महामार्ग क्रमांक ५३ च्या बाजूला नाल्यात बेशुद्धावस्थेत आढळून आले. स्थानिक लोकांच्या मदतीने त्यांना मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात हलविले असता तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसांनी घटनेची नोंद करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविला. उष्माघाताने त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, १२ वर्षीय विद्यार्थ्याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना ही बुलडाणाच्या शेगाव येथे घडली. संस्कार सोनटक्के (वय 12) असे उष्माघाताने मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. संस्कार शेगाव येथील संत गजानन महाराज ज्ञानपीठमध्ये इयत्ता 6 वीत शिकत होता. त्याला अचानक उन्हाचा त्रास झाल्याने नातेवाईकांनी अकोला येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान संस्कारचा मृत्यू झाला.
जळगावातील डॉक्टराने केलं आवाहन
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात काल एकाचा उष्माघाताने मृत्यू झाल्यानंतर डॉ. किरण पाटील शल्य चिकित्सक, शासकीय रुग्णालय, जळगाव यांनी आवाहन केलं आहे की, वाढते तापमान शरीराला त्रासदायक आहे. उन्हापासून बचाव करणे, हे आरोग्याला सुरक्षित ठेवू शकेल. कामासाठी घराबाहेर पडताना पाण्याची बाटली, डोक्याला रुमाल आणि पांढरे कपडे परिधान करून बाहेर पडावे. उन्हामध्ये पायी फिरण्याचे टाळायला हवे. उन्हाची तीव्र झळ बसल्यास तोंडाला कोरड, डोकेदुखी, अशक्तपणा असा त्रास होऊ शकतो. अशी लक्षणं आढळल्यास तत्काळ डॉक्टरकडे जावे.