वाढत्या तापमानामुळे केळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

तरुण भारत लाईव्ह । १७ मे २०२३। एप्रिल महिन्यात राज्यातील विविध भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्याचा शेती पिकांवर मोठा परिणाम झाला. अशातच हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यातील तापमानाचा पारा वाढणार आहे. एकीकडे मे महिन्याच्या सुरुवातीलाच विदर्भात नद्यांना पूर आला आहे तर, दुसरीकडे तापमानात पुन्हा वाढ होत आहे. त्याचा फटका आता केळी पिकांना बसणे सुरू झाले आहे.

हवामान विभागाच्या मते, देशातील बहुतांश भागात 40 अंशांपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. जळगाव जिल्ह्यात 44.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे तर, अकोला येथेही पारा 44 अंशाच्या पुढे गेला असून, धुळे, परभणी वर्धा येथे तापमान 43 अंशांपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले. राज्यात बहुतांश ठिकाणी तापमान चाळीशीपार गेले आहे.आधी अवकाळी आणि गारपीट, आता वाढलेली उष्णता यांमुळे वाढत्या उष्णतेचा परिणाम शेतपिकांवरही होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

हिंगोलीत तर वाढत्या तापमानामुळे केळीच्या बागा होरपळल्या आहेत. हिंगोली जिल्ह्याचे तापमान 42 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊन पोहोचल्यामुळे केळीच्या बागा होरपळून निघत आहेत. केळीची पानं या तापमानामुळे पिवळी पडत आहेत, तर काही पानं वाळली आहेत. केळीच्या झाडांमधील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यानं अनेक केळीची झाडं उन्मळून पडली आहेत