मुंबई : मुंबईत रविवार रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. रेल्वेरुळांवर ठिकठिकाणी पाणी साचल्याने लोकलसेवा ठप्प झाली असून अनेक एक्स्प्रेसही अडकल्या आहेत. अधिवेशनसाठी अनेक आमदार एक्स्प्रेसमधून मुंबईकडे येत होते. पण, जोरदार पावसामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांसोबत आमदारांना देखील सहन कराला लागला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील १० ते १२ आमदार अडकल्याची माहिती आहे.
विदर्भ, अमरावती एक्स्प्रेस कुर्ला, घाटकोपरदरम्यान अडकली आहे. यावेळी १० ते १२ आमदार ट्रेनमध्ये होते. आमदार अमोल मिटकरी, मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील ट्रँकनं चालत बाहेर निघाले आहेत. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आ. संजय गायकवाड , आ. अमोल मिटकरी, आ. जोगेंद्र कवाडे, अनिल पाटील आणि इतर सात आमदार हावडा मेलमध्ये अडकले आहेत. अनेक जण ट्रेनमधून खाली उतरून रुळांवरून चालत निघाले. तसेच सोलापूर वरून मुंबईला येणारी सिध्देश्वर एक्सप्रेस गाडी कुर्ला येथे अडकली आहे.
सुभाष देशमुख, सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि औसा मतदारसंघ आमदार अभिमन्यू पवार हे देखील ट्रेनमध्ये अडकले आहेत. पावसाचा फटका बसल्यानंतर ट्रेन अडकल्याने प्रवाशांनी एक्स्प्रेस सोडून पायी चालणं पसंत केलं आहे. अनेक आमदारांनीही हाच मार्ग निवडल्याचं दिसून आलं.