नवी दिल्ली : हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळाला आहे. पावसामुळे झालेले अपघात, भूस्खलन आणि पुरामुळे मंगळवारी आणखी 21 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यासह, 8 जुलैपासून या भागातील मृतांची संख्या 91 वर गेली आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भूस्खलनामुळे मध्य प्रदेशातील तीन गंगोत्री यात्रेकरूंसह आठ जणांचा मृत्यू झाला.
हिमाचल प्रदेशातील लाहौल-स्पिती जिल्ह्यातील चंद्रताल येथे मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टीमुळे 300 पर्यटक अडकले आहेत. मुसळधार पावसामुळे झालेल्या आपत्तीत गेल्या तीन दिवसांत राज्यात 31 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याचवेळी, उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे मंगळवारी भूस्खलनामुळे पाच पर्यटकांचा मृत्यू झाला, तर आठ जण जखमी झाले. डोंगराळ भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक पर्यटकांना जीव गमवावा लागला. पंजाब आणि हरियाणामध्येही पूरस्थिती आहे, त्यामुळे पर्यटक ठिकठिकाणी अडकून पडले आहेत.
राज्यातील विविध भागात सुमारे 600 पर्यटक अडकले आहेत. सोमवारपासून राज्याच्या विविध भागात अडकलेल्या 100 पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे. हरियाणा आणि पंजाबमध्ये तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कोट्यवधींच्या मालमत्तेचे नुकसान झाले असून 11 जणांचा मृत्यू झाला आहे. पंजाबमध्ये मंगळवारी तिघांचा मृत्यू झाला. दोन्ही राज्यांमध्ये अनेक घरे पाण्याखाली गेली असून पिकांचे नुकसान झाले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.