पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये पावसाने दडी मारली होती. मात्र, कालपासून मुंबई आणि कोकणात पावसाने हजेरी लावली आहे. आगामी काळात पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मोसमी वाऱ्याचा मागील दोन दिवसांपासून जोर वाढला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्यामुळे १९ ते २२ जुलै या काळात राज्यात सर्वदूर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.
जुलै महिना अर्धा संपलेला असताना राज्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. सध्या महाराष्ट्रातील काही भागात पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी पावसाची गरज आहे. मात्र, पावसानं चांगलीच दडी मारल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. मात्र आता मोसमी वाऱ्याचा जोर वाढला आहे. त्यामुळे बाष्पांनी भरलेले ढग पश्चिम घाट ओलांडून पुढे जातील. याच काळात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्यामुळे १९ ते २२ जुलै या काळात राज्यात चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
राज्यामध्ये पुढील पाच दिवसांसाठी दिलेल्या प्रादेशिक अंदाजानुसार मंगळवारपर्यंत कोकण विभागात बहुतांश सर्व ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उत्तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडू शकतो. दक्षिण मध्य महाराष्ट्रात रविवारपासून पावसाची व्याप्ती वाढू शकते. मराठवाड्यातही बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर पूर्व आणि पश्चिम विदर्भातही रविवारपर्यंत बऱ्याच ठिकाणी आणि त्यानंतर बहुतांश सर्व ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोकणाबरोबरच उत्तर महाराष्ट्र आणि सोलापूरपर्यंतच्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.