जळगाव : जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून जोरदार पाऊस सुरु आहे. खरीप पिकांना संजीवनी प्राप्त झाली असून, सर्वत्र पाण्याची डबकी व हिरवळ असे निसर्गाचे रूपडे तयार झाल्यामुळे उत्साह व आनंद यांना उधाण आले आहे. शेतातील पिके तरारली आहेत. मात्र भरपूर पाऊस होऊन देखील अंजनी धरणात पाण्याची आवक अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे पाणी कुठे मुरले ? असा प्रश्न शेतकऱ्यांच्या गोटातून उपस्थित केला जात आहे. आजच्या घटकेला अंजनी धरणात ०.२५% एवढा जलसाठा असल्याची माहिती एरंडोल गिरणा पाटबंधारे उपविभागीय अभियंता सुभाष चव्हाण यांनी दिली.
एरंडोल तालुक्यात यावर्षी मृग नक्षत्रात पावसाने पहिल्यांदा हजेरी लावून शुभसंकेत मिळाला. त्यानंतर दोन तीन पाऊस झाल्यामुळे खरीप पेरण्या करण्यात आल्या. मधल्याकाळात काही दिवस वरूणराजा रूसून बसला. त्यानंतर मात्र दररोज कधी रात्री, तर कधी पहाटे,तर कधी दुपारी पावसाने बॅटिंग केली. भरपूर पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या.पण आतापर्यंत झालेला पाऊस हा जिरता असल्यामुळे मुसळधार पावसाची गरज असल्याचे बोलले जात आहे.
गेल्या वर्षी गिरण धरणातील अत्यल्प साठ्यामुळे गिरणा लाभक्षेत्रात आवर्तन सुटले नाही.त्यामुळे आतापर्यंत झालेल्या पावसाचे पाणी रानात,नाल्यात व ओढ्यात जिरले. याशिवाय अंजनी धरणाच्या वरच्या भागात जवळपास २० ते २२ लहान मोठे बंधारे असून ते ओव्हर फ्लो झाल्यावरच अंजनी धरणात पाण्याची आवक सुरू होते हे वास्तव आहे.
भरपूर पाऊस होऊनही धरणात जलसाठा का वाढला नाही.पाणी कुठे मुरते? असे प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहेत.अजुनही ७५% पावसाळा शिल्लक असून अंजनी धरण यावर्षी पाण्याने १००% भरेल असा जाणकारांचा अंदाज आहे.