राज्यात जोरदार पाऊस; ‘या’ भागात ऑरेंज अलर्ट, पुढचे चार दिवस कोसळणार

xr:d:DAFtd8oCXa8:2651,j:1361637623300043021,t:24041212

मुंबई : मुंबई आणि उपनगरात रात्रीपासून पाऊस सुरु आहे. तसंच पहाटे पावसाचा जोर वाढला आहे, त्यामुळे मुंबईतील विविध भागात पाणी साचलं आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साठलं आहे. दरम्यान हवामान खात्याने महाराष्ट्रात सोमवारी सर्वच जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. तसेच रत्नागिरी, पुणे, सातारा या जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.

हवामान विभागाने महाराष्ट्रातील काही भागासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अलर्टनुसार पुढचे पाच दिवस दिवस कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, अंतर्गत कर्नाटक, मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने रविवारी दिली. तसेच मध्य महाराष्ट्रात ९ ते ११ जुलै दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. ८ जुलै रोजी मध्य महाराष्ट्रातील घाट भागात अतिवृष्टीचा अंदाज विभागाने वर्तवला आहे.

मुंबईत ८ ते १३ जुलै या कालावधीत ढगाळ वातावरण राहणार आहे. ८ जुलै रोजी मध्यम ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. ९ जुलै रोजी हलक्या पावसासह तापमान २५ अंश सेल्सिअस ते ३३ अंश सेल्सिअस दरम्यान राहील. १० जुलै रोजी मध्यम पावसाची शक्यता आहे. ११ जुलै मध्यम तर १२ आणि १३ जुलैला चांगल्या पावसाचा अंदाज आहे.

रेल्वे वाहतूक विस्कळीत

मुंबईच्या मध्य रेल्वे आणि ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गांवरही पाणी साठलं आणि वाहतूक विस्कळीत झाली आहे. महाराष्ट्रातील कल्याण आणि कसारा स्थानकांदरम्यान मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या वळवण्यात आल्या आहेत, काही गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत.