मुंबईत प्रचंड पाऊस, राज्यात अशी राहिल परिस्थिती

मुंबई :  मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत असल्याने शहरासह उपनगरांमध्ये पाणीच पाणी झाले आहे. बुधवारी सायंकाळपासून शहरातील काही भागांत पावसाची संततधारी सुरू झाली असून आज पहाटेपासून पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळाला. गुरुवारी दिवसभर शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस कोसळू शकतो, असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, आज आणि उद्या मुंबईत जोरदार पाऊस कोसळल्यानंतर २० जुलै आणि २१ जुलै रोजी पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता असून २२ जुलै आणि २३ जुलै रोजी पुन्हा शहराला पाऊस झोडपून काढेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना नागरिकांना योग्य ती खबरदारी घ्यावी लागणार आहे.

रविवार दि. २१ जुलै गुरुपौर्णिमेपर्यंत मुंबईसह कोकण व विदर्भातील १७ जिल्ह्यात जोरदार तर संपूर्ण मराठवाडा, खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे. गुरुवारी राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. बहुतांशी ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाची हजेरी लावली. मात्र शुक्रवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.