नागपुरात ढगफुटीसदृश पाऊस! शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

नागपूर : नागपुरात शुक्रवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपुरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह अविरत मुसळधार पावसाने शुक्रवारी रात्री संपूर्ण नागपूरला झोडपून काढले आणि अनेक परिसर पुराच्या पाण्यात बुडाले. रात्रभर पडलेल्या पावसाने शहरातील अनेक भाग जलमय झाले असून त्यामुळे रहिवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात हाहाकार माजला आहे. नागपुरात रात्री १०६ मिमी पावसाची हवामान खात्याने नोंद केली आहे. रात्री अचानक आलेल्या पावसाने सर्वत्र पाणी साचल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकांच्या घरात पाणीत शिरले आहे. प्रशासनाने आज शाळांना सुट्टी जाहीर केली.

मध्यरात्री दोन वाजेपासून पहाटे पाचपर्यंत शहरात ढगांचा गडगडाट होता. तर मोठ्या प्रमाणात वीजा कडाडत होत्या. त्यामुळे नागरिक अक्षरश: जीव मुठीत घेऊन बसले होते. या तीन ते चार तासांत कोसळलेल्या पावसाचा सर्वाधिक फटका पंचशील चौक, सीताबर्डी व आजूबाजूच्या परिसराला बसला. पंचशील चौकात अनेक रुग्णालये असून या रुग्णालयांच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरले. चार ते पाच फूट पाण्यामुळे परिसरातील चारचाकी वाहनेही पाण्यात होती. तर यात काही रुग्णवाहिकादेखील पाण्याखाली आल्या.

नागपुरात पंचशील चौक परिसरात चार ते पाच फुट पाणी साचले. या परिसरात रुग्णालयांची संख्या अधिक असून अनेक रुग्णालयांमध्येदेखील पाणी शिरले. तसेच शंकरनगरातील वोकहार्ट रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा युनिट पाण्याखाली गेल्याचे वृत्त आहे. शहरातील मोरभवन हे शहर बसस्थानकही पूर्णपणे पाण्याखाली आले. बसेस अर्ध्याहून अधिक पाण्याखाली आल्या. सीताबर्डी मेट्रो स्थानकालाही पावसाचा फटका बसला. नागपूर रेल्वेवरील रेल्वे रुळ प्लॅटफार्मपर्यंत पूर्णपणे भरून गेल्याने अनेक गाड्यांना उशीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

नागपुरात मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक खोल भागात पाणी शिरले असून अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. हवामान विभागाने नागपुरात आधीच ऑरेंज अलर्ट जारी केला होता. खरं तर इथे अजूनही पाऊस पडत आहे. त्यामुळे प्रशासनाने शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. नागपुरात गेल्या २४ तासांत विक्रमी पावसाची नोंद झाली असून अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. पावसामुळे अनेक भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने काम सुरू केले. याबाबत आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. त्यानुसार एनडीआरएफची एक तुकडी आणि एसडीआरएफच्या दोन तुकड्या बचाव आणि मदतकार्यासाठी तैनात करण्यात आल्या आहेत.

सततच्या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी एसडीआरएफच्या २ तुकड्या ७ गटात विभागल्या आहेत. नागपूर पूरपरिस्थितीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने लक्ष ठेवून प्रशासनाला योग्य त्या सूचना, आदेश देत आहेत. नागपुरात एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीमने आतापर्यंत १४० लोकांना सुरक्षित बाहेर काढले आहे. त्याचसोबत मुक बधीर विद्यालयातील ४० विद्यार्थ्यांना सुखरुप बाहेर काढले आहे. नागपूर शहराच्या विविध भागात सध्या २ एनडीआरएफ टीम सक्रीय आहेत. त्याचसोबत महापालिकेचे अग्निशमन दलाचे पथकही बचाव कार्यात उतरले आहेत. अंबाझरी परिसरात लष्कराच्या २ तुकड्या पोहचल्या आहेत.

पूरामुळे खबरदारी म्हणून नागपुरात शाळा-महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. गरज नसेल त्यांनी घराबाहेर पडू नका असं आवाहन स्थानिक प्रशासनाकडून लोकांना केले जात आहे. त्याचसोबत वृद्ध नागरिकांना सर्व ती मदत तातडीने द्या असे निर्देश फडणवीसांनी दिले आहेत. दरम्यान, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि घाबरून जाऊ नका असं आवाहनही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी लोकांना केले आहे.