पुणे : तीन-चार दिवसांचा ब्रेक घेतल्यानंतर वरुणराजा आज पुन्हा जोरदार बरसणार आहे. पुढील २४ तासात राज्यातील अनेक भागात पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिकसह मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबदारी बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर बंगालच्या उपसागरावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र आज उत्तर पश्चिम आणि लगतच्या पश्चिम बंगालच्या उपसागरावर आहे. पुढील २३ तासांत याचे रूपांतर अतितीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील तीन दिवस राज्यात मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार असल्याने विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुळसाधार पावसाची शक्यता असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आज मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वीजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भात सुद्धा वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. याशिवाय, विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
याचबरोबर, १५ ते १६ आणि १७ सप्टेंबरल दरम्यान कोकणात आणि गोव्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. विशेषत: रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता आहे. १५ सप्टेंबरला मध्य महाराष्ट्रात घाट विभागात पाऊस होण्याची शक्यता आहे. १६ आणि १७ सप्टेंबरला मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.