---Advertisement---
जळगाव : मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली असून, या परतीच्या प्रवासादरम्यान जिल्ह्यातील जामनेर, पाचोरा, मुक्ताईनगर तालुक्याला पावसाने जोरदार तडाखा दिला. दरम्यान, अजून पावसाचा शेवटचा टप्पादेखील जिल्ह्यात जोरदार बरसण्याची शक्यता असून, नवरात्रोत्सवात जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यात १८ सप्टेंबर पर्यतच्या सरासरीनुसार ९६ टक्के पाऊस झाला आहे, तर वार्षिक सरासरीच्या ८८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, आगामी दोन दिवस जिल्ह्यात ठराविक तालुक्यांमध्ये पावसाची हजेरी लागणार आहे. त्यानंतर मात्र २२ ते २४ सप्टेंबर दरम्यान तुरळक व मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
मात्र, सप्टेंबर अखेरीस जिल्ह्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाचाही अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे जिल्ह्यात पुढील आठवड्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
वातावरणावर हवामान बदलाचा मोठ्या प्रमाणात परिणाम होत जात असून, पावसाळा आपल्या निर्धारित वेळेपेक्षा एक महिना उशिराने परत जात आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यातील पावसाची सरासरी वाढली आहे. तसेच सप्टेंबर महिन्यात पिके काढणी व कापणीवर येत असतात, अशा वेळेस सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यास पिकांचे नुकसान होण्याचे प्रमाण अधिक असते.
तसेच गेल्या पाच ते सहा वर्षात सप्टेंबर महिन्यातच बंगालचा उपसागरावर कमी दाबाचे हवेचे क्षेत्र सातत्याने विकसित होत असतात, त्यामुळे सप्टेंबर महिन्यातच सर्वाधिक पाऊस होत आहे. यंदाही बंगालच्या उपसागरालगत कमी दाबाचे क्षेत्र विकसित होत असून, यामुळे आगामी आठवड्यात जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे.