जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाने नुकसान, आपत्तीग्रस्तांना लवकरच मिळणार मदत

---Advertisement---

 

जळगाव : जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून मुसळधार पाऊस होत आहे. शनिवार (16 ऑगस्ट) व रविवार (17 ऑगस्ट ) रोजी मुसळधार पाऊस व विजेचा तडाख्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यात विविध तालुक्यांमध्ये शेतपिकांचे, घरांचे, जनावरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून प्रशासनाने तातडीने मदत कार्यास प्रारंभ केला आहे.

तालुकास्तरावर प्रांताधिकारी, तहसीलदार तसेच महसूल व कृषी खात्याचे अधिकारी यांनी नुकसानीची पाहणी करून पंचनामे सुरू केले आहेत. बाधित कुटुंबांना तात्पुरते निवारा, अन्न, पिण्याचे पाणी व बिछायतची व्यवस्था करुन देण्यात आली आहे.

यात अमळनेर तालुक्यातील पातोंडा व नांद्री गावांतील पारधी वस्त्यांना पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांना शाळा व स्थानिक भवनात हलविण्यात आले आहे. भडगाव तालुक्यात कनाशी व बोरनार येथे कपाशीचे नुकसान झाले आहे. कोठली येथे ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

रावेर तालुक्यात नागझिरी नाल्याला पूर आला आहे. रावेर तालुक्यातील बक्षीपुर येथे घराची भिंत कोसळून सात-आठ शेळ्या दगावल्याची घटना घडली आहे. जळगाव तालुक्यात वडली जवखेडे व बोरनार-लमांजन शिवारात पिकांचे नुकसान झाले आहे. धरणगाव तालुक्यात कल्याणे खुर्द येथे नुकसानाची प्रशासनातर्फे पाहणी करण्यात आली आहे. पारोळा व एरंडोल तालुक्यात विविध शिवारात पिकांची हानी झाली आहे. बोदवड तालुक्यात घरावर झाड कोसळून नुकसान झाले असून घरातील एका व्यक्तीला दुखापत झाली आहे. पाचोरा तालुक्यातील लासगाव, सामनेर येथे पीकनुकसानीची पाहणी करण्यात आली आहे.

---Advertisement---

 

जिल्हा प्रशासनातर्फे आपत्तीग्रस्तांना शासनाकडून मदत व नुकसानभरपाई लवकरात लवकर देण्यात येणार आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---