---Advertisement---
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु असून, अनेक भागात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशात पुन्हा आगामी दोन दिवस जिल्ह्यात दमदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
जिल्ह्यात बुधवारी रात्री सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली असून, चोपडा, मुक्ताईनगर, रावेर, यावल या तालुक्यांमध्ये दमदार पावसाची नोंद झाली आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातील पावसाची सरासरी ९४ टक्क्यांवर आली आहे.
जळगाव जिल्ह्यात ४ सप्टेंबरपर्यंत ५२५ मिमी एवढा पाऊस होत असतो, आतापर्यंत जिल्ह्यात ४९६ मिमीपर्यंत पाऊस झाला आहे. १५ ऑगस्टपर्यंत पावसाची तूट ३९ टक्क्यांपर्यंत पोहोचली होती. मात्र, गेल्या तीन आठवड्यांपासून होत असलेल्या पावसामुळे ही तूट भरून निघण्यास मदत होत आहे.
बुधवारी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पावसाने हजेरी लावली. एकाच दिवसात जिल्ह्यात एकूण १३ मिमी पावसाची नोंद झाली असून, सर्वाधिक २८ मिमी पाऊस मुक्ताईनगर तालुक्यात झाला. जिल्ह्यात अनेक दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू असून, ७ सप्टेंबरनंतर जिल्ह्यातून काही दिवस पाऊस ब्रेक घेण्याची शक्यता आहे.