हाहाकार ! आसाममध्ये मुसळधार पाऊस; 52 जणांचा मृत्यू

मुसळधार पाऊसामुळे आसाममध्ये पुराने हाहाकार मांडला आहे. परिणामी जवळपास 24 लाख लोक प्रभावित झाले असून,  राज्यात अत्यंत भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. यावर्षी पूरसंबंधित अपघातांमुळे 52 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

भीषण पुराचा सामना करणाऱ्या आसाममध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. सरकारच्या माहितीनुसार, 29 जिल्ह्यांमध्ये एकूण 23,96,648 लोकांना पुराचा फटका बसला आहे, तर 68,768.5 हेक्टर पिके पाण्याखाली गेली आहेत. एकूण 53,429 बाधित लोकांनी 577 मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे.

निमतीघाट, तेजपूर, गोलपारा आणि धुबरी येथे ब्रह्मपुत्रा नदी धोक्याच्या चिन्हावरून वाहत आहे. त्याच्या उपनद्याही अनेक ठिकाणी धोक्याच्या चिन्हावरून वाहत आहेत.

आसाममधील प्रसिद्ध काझीरंगा नॅशनल पार्क मध्ये आलेल्या विनाशकारी पुराने 114 वन्य प्राण्यांचा जीव घेतला आहे. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. केएनपीमध्ये चार गेंडे आणि 94 ‘हॉग डीअर’चा बुडून मृत्यू झाला. याशिवाय उपचारादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या इतर 11 जनावरांचाही यात समावेश आहे.

आसाममधील पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये गोलपारा, नागाव, नलबारी, कामरूप, मोरीगाव, दिब्रुगढ, सोनितपूर, लखीमपूर, दक्षिण सलमारा, धुबरी, जोरहाट, चरैदेव, होजई, करीमगंज, शिवसागर, बोंगईगाव, बारपेटा, धेमाजी, हैलाकांडी, बिरहाटवा, गोलाकांडी या जिल्ह्यांचा समावेश आहे.