एरंडोल तालुक्यात मुसळधार पाऊस, पिकांसह गुरे, घरांचे नुकसान

---Advertisement---

 

एरंडोल : तालुक्यात झालेल्या संततधार पावसामुळे सुमारे ८ हजार १३९ शेतकऱ्यांचे तब्बल ६ हजार ५३७ हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले असल्याचे व सुमारे दोनशे घरांचे नुकसान झाले असल्याची माहिती तहसीलदार प्रदिप पाटील यांनी दिली. तरी यासर्व ठिकाणी पंचनाम्याचे काम सुरु असल्याचे देखील त्यांनी सांगितले.


तालुका तथा परिसरात झालेल्या संततधार पावसामुळे कापूस, सोयाबीन, मका, ज्वारी, बाजरीसह, कड धान्याचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकऱ्या समोर आर्थिक संकट उभे राहिले असून याच पावसात जवळपास ३० पशुधन मृत्युमुखी पडले असून पाच गुरांच्या गोठ्यात पाणी शिरल्याने चाऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

तहसीलदार प्रदिप पाटील यांच्यासह गटविकास अधिकारी दादाजी जाधव, मंडळ अधिकारी दिपक ठोंबरे, ग्राम महसूल अधिकारी ए.एस. तागडे, ग्रामपंचायत अधिकारी आर. एस. पाटील यांनी टोळी खु.,एरंडोल,खडके बु.,रवंजे बु., खु.,खर्ची खु., बु.,या गावांना भेटी देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

टोळीचे माजी सरपंच बाळासाहेब पाटील यांनी नुकसानीची माहिती दिली.तहसीदार व पथकातील सदस्य नुकसानीची माहिती घेत असताना शेतकरी भावनाविवश झाले होते. याच बरोबर आमदार अमोल पाटील यांनी देखील विविध गावांना भेटी देऊन अधिकाऱ्यांना त्वरित पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.

शनिवारी व रविवारी विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली असून रिंगणगाव येथे सर्वाधिक १०० मी.मी.पावसाची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यात ६६ मी.मी.पाऊस झाल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. परिसरातील बहुतांश पाण्याचे स्रोत भरले असल्याने शहरासह ग्रामीण भागातील पाण्याची समस्या दूर झाली आहे. शहरातील नविन वसाहतींमध्ये मात्र तलावाचे स्वरूप प्राप्त झाले असून नगर पालिकेने त्वरित दखल घेऊन सांडपाण्याची समस्या दूर करावी अशी मागणी जोर धरत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---