---Advertisement---
पाचोरा : तालुक्यातील शिंदाड, राजुरी, निंभोरे, वानेगाव, वाडी-शेवाळे यासह परिसरात सोमवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना मोठा पूर आला. डोंगर माथ्यावर झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराच्या पाण्याने गावांमध्ये शिरकाव करत घरांचे, शेतीचे तसेच गुराढोरांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
पूरामुळे अनेक शेतकऱ्यांचे पिके वाहून गेली असून घरांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. जनावरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचेही प्राथमिक अहवालात समोर आले आहे. या गंभीर परिस्थितीची आमदार किशोर पाटील यांचे सुपुत्र सुमित किशोर पाटील यांनी पूरग्रस्त गावांचा दौरा करून प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधून नुकसानग्रस्त शेतकरी व महिलांची विचारपूस केली. तसेच शासनाकडून तातडीने मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
या दौऱ्यात जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, प्रांताधिकारी भूषण अहिरे,तहसीलदार विजय बनसोडे, माजी आमदार दिलीप वाघ,वैशाली सूर्यवंशी,शहर प्रमुख सुमित सावंत, तसेच शेतकरी सेना प्रमुख सुनील पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने पंचनामे करून मदत जाहीर करावी, अशी मागणीही यावेळी गावकऱ्यांकडून करण्यात आली. पावसामुळे झालेल्या या नुकसानीमुळे शेतकरी हतबल झाले असून सर्वसामान्य ग्रामस्थांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे.